आम्ही सवंगडी गोट्या, विटी-दांडू खेळायचो, आता सारं सुन्न झालंय!, वर्गमित्र उदय शहा कळसकर यांनी जागवली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 06:02 IST2026-01-29T06:01:29+5:302026-01-29T06:02:07+5:30
Ajit Pawar Death News: ‘कुटुंबातील आपलं माणूस गेल्यासारखं सारं काही सुन्न झालंय. काळाकुट्ट अंधार दाटलाय. दादा गेल्यावर विश्वासच बसत नाही.

आम्ही सवंगडी गोट्या, विटी-दांडू खेळायचो, आता सारं सुन्न झालंय!, वर्गमित्र उदय शहा कळसकर यांनी जागवली आठवण
बारामती : ‘कुटुंबातील आपलं माणूस गेल्यासारखं सारं काही सुन्न झालंय. काळाकुट्ट अंधार दाटलाय. दादा गेल्यावर विश्वासच बसत नाही. आम्ही १ली ते १०वी एकाच वर्गात शिकलो. आमराईतील आप्पासाहेबांच्या बंगल्यावर ते राहायचे, मी समोर बोहरी चाळीत. गोट्या, विटी-दांडू, पतंग उडवणे, क्रिकेट, खो-खो... हे सगळे खेळ एकत्र खेळलो’, अशी आठवण अजितदादांचे बारामतीतील वर्गमित्र उदय शहा कळसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना भावुक होऊन सांगितली.
आमचा मित्र महाराष्ट्राचा नेता होता, मोठा मंत्री होता, पण त्यांनी आमच्याशी वागताना तो आव कधीच आणला नाही. वर्गमित्र म्हणूनच ते आमच्याशी नातं ठेवून होते. कोणत्याही कार्यक्रमात भेट झाल्यावर आवर्जून जवळ बाेलावून खांद्यावर हात टाकून आमच्याशी गप्पा मारीत. कुटुंबियांची, विचारपूस करीत. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाने आमच्या मनात कायमच घरं केलं आहे, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.