"जनता अन् आमदारांच्या मनातलं जाणून घेऊ, सुनेत्रा वहिनींशी बोलणं महत्त्वाचं.."- सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:34 IST2026-01-30T16:32:01+5:302026-01-30T16:34:30+5:30
धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करू. त्यानंतर जे काही आहे ते आम्ही ठरवू असं सांगत तटकरेंनी उपमुख्यमंत्रिपदावर भाष्य केले.

"जनता अन् आमदारांच्या मनातलं जाणून घेऊ, सुनेत्रा वहिनींशी बोलणं महत्त्वाचं.."- सुनील तटकरे
मुंबई - अजित पवार यांच्या निधनानंतर आता रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पुढच्या घडामोडींवर चर्चा करण्यात आली. सध्या आम्ही शोकाकुल वातावरणात आहोत. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप काही चर्चा नाही असा खुलासा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे राष्ट्रवादी कार्यालयात पोहचले होते. त्याठिकाणी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तटकरे म्हणाले की, अजितदादांच्या अकाली जाण्याचा आम्हाला धक्का बसला आहे. या धक्क्यातून आम्ही कुणी सावरलो नाही. अजूनही अजितदादा आमच्यातच आहे असं वाटतंय. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे क्लेशदायक आहे. ज्या कार्यालयातून अजित पवारांनी पक्षाचे संघटन उभे केले तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे याच भावनेतून मी इथे आलो होतो. माझी कुठलीही पत्रकार परिषद नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सुनेत्रा वहिनी आणि परिवार धार्मिक विधीत आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर सर्व परिवाराशी चर्चा करू. त्यानंतर जे काही आहे ते आम्ही ठरवू. जनतेच्या मनातलं, आमदारांच्या मनातलं आम्ही जाणून घेऊ. वहिनींशी बोलणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक कृती संवेदनशीलपणे करू असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजितदादांनी ज्यारितीने महाराष्ट्र घडवला त्यामुळे आज त्यांच्या निधनाने राज्य शोकमग्न आहे. दादांचे विविध पैलू महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यामुळे त्याच शोकाकुल वातावरणात आम्ही आहोत. मुख्यमंत्र्यांची भेट झाली पण बाकीचा जो विषय असेल त्याबाबत कुठलीही चर्चा नाही असं सांगत सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले.