अजित पवारांसारखा उमदा नेता महाराष्ट्राने गमावला; 'ती' आठवण कायम स्मरणात, संजय राऊत भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:46 IST2026-01-28T10:46:14+5:302026-01-28T10:46:39+5:30

राजकारण कोणत्याही स्तराला गेले तरी पवार कुटुंब अभेद्य राहिले. पवार कुटुंबावर हा सगळ्यात मोठा आघात आहे. शरद पवारांनंतर अजित पवार कुटुंबाचे कर्ते पुरुष होते असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Ajit Pawar Dead: Maharashtra lost a noble leader like Ajit Pawar; memory will always be remembered, Sanjay Raut emotional | अजित पवारांसारखा उमदा नेता महाराष्ट्राने गमावला; 'ती' आठवण कायम स्मरणात, संजय राऊत भावूक

अजित पवारांसारखा उमदा नेता महाराष्ट्राने गमावला; 'ती' आठवण कायम स्मरणात, संजय राऊत भावूक

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक जीवनातला आज काळा दिवस आहे. अजित पवार अपघातातून सुखरुप बाहेर यावे अशी आम्ही प्रार्थना करत होतो. पण दुर्दैवाने ही धक्कादायक बातमी आमच्या कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. त्यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता असं होते. अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे बोलणे, कामाची पद्धत, प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचे नाते होते. त्याच बारामतीत त्यांचा मृत्यू व्हावा हा विचित्र योगायोग आहे. श्रद्धांजली त्यांना वाहावी लागेल असं मनात कधी आले नाही अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटला पूर्ण तयारी करून येणारे अजित पवार हे मंत्री होते. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम राहिले. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणले. त्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षापासून ते शरद पवारांपासून दूर राहून त्यांनी राजकारण सुरू केले. त्या राजकारणाचा अकाली अंत होईल हे ध्यानीमनी नव्हते. कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांना मिळालेले पद जनतेसाठी वापरले. जरी त्यांच्या बोलण्यात राग आला, एखादं विनोदी वाक्य वापरून वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती. आज महाराष्ट्र खरोखर दु:खात आहे. महाराष्ट्रावर कोणतं संकट आलंय, काय ग्रह फिरलेत माहिती नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे प्रमुख नेते आपल्यापासून काळाने हिरावून घेतले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता अजित पवार गेले असं त्यांनी सांगितले. 

तसेच ५-६ वेळा ते उपमुख्यमंत्री होते. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला उत्तम कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता. पण दुर्दैवाने ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि आज या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला आणखी काय पाहावे लागणार हे सांगता येत नाही. अजित पवारांच्या निधनानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. पवार कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

संजय राऊतांनी सांगितली 'ती' आठवण

दरम्यान, शरद पवारांसोबत जेव्हा जेव्हा आमच्या बैठका व्हायच्या तेव्हा अजित पवार तिथे असायचे. अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली त्याच्या आदल्या रात्री ११ पर्यंत ते आमच्यासोबत होते. ११ नंतर शोधाशोध करताना ज्या घडामोडी घडल्या त्या फार रंजक होत्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार बनवताना अजित पवारांची सोबत अत्यंत महत्त्वाची होती. जेव्हा सरकार बनले आणि शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंसोबत अजित पवारांनीही शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मंत्रालयात गेले तिथून पहिला फोन मला केला होता. सरकार बनवताना जे कष्ट आपण सगळ्यांनी घेतले, विशेषत: माझा उल्लेख केला ते कायम स्मरणात राहील अशी आठवण राऊतांनी सांगितली.

पवार कुटुंबावर मोठा आघात 

राजकारणात टीका होते, अजित पवार फार कमी टीका करायचे. त्यांनी वेगळी भूमिका घेतली तेव्हा आम्ही टीकेचे बाण सोडले. ते शांत राहून काम करत राहिले. राजकारणात अशी माणसे दुर्मिळ असतात. अत्यंत उमद्या वयात ते आपल्यातून निघून गेले. राजकारणात फार मोठी खेळी ते करू शकले असते. अलीकडेच अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले त्याचा आनंद सगळ्यांना झाला, कार्यकर्त्यांना होता. काका पुतणे एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद होता पण हा आनंद फार काळ टिकला नाही. राजकारण कोणत्याही स्तराला गेले तरी पवार कुटुंब अभेद्य राहिले. पवार कुटुंबावर हा सगळ्यात मोठा आघात आहे. शरद पवारांनंतर अजित पवार कुटुंबाचे कर्ते पुरुष होते. अशा कर्त्या पुरुषाचे जाणे यासारखे भीषण दु:ख कशात नाही असंही राऊतांनी सांगितले.

महाराष्ट्रातलं राजकीय चित्र विदारक

अपघात कसा झाला याची चौकशी व्हायला हवी. अजित पवार सातत्याने विमान प्रवास करत होते. परंतु यानिमित्ताने सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राजकारणातील हव्यास असतो, नगरपालिकांपासून महापालिका, जिल्हा परिषदा यासाठी सध्या राजकारणी, राज्यकर्ते धावाधाव करतायेत याला कुठे तरी बांध घातला पाहिजे. काही निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडा, नेतृत्वाला फार धावाधाव करायची गरज नाही. योग्यवेळी त्यात लक्ष घातले पाहिजे. परंतु गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचं राजकीय चित्र विदारक झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास राजकारणात, राजकीय स्पर्धेत गुंतल्याने राजकीय बळी जातायेत. अपघात किंवा मृत्यू कधी होईल सांगता येत नाही. महाराष्ट्रातला हा पहिला प्रसंग आहे. राज्यातला प्रमुख नेता विमान अपघातात आपल्याला सोडून गेला. उमदा नेता महाराष्ट्र गमावून बसला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

Web Title : महाराष्ट्र ने अजित पवार को खोया: संजय राउत ने शोक जताया, महत्वपूर्ण क्षणों को याद किया

Web Summary : संजय राउत ने अजित पवार के असामयिक निधन पर शोक व्यक्त किया, इसे महाराष्ट्र के लिए एक काला दिन बताया। उन्होंने पवार के समर्पण, प्रशासनिक कौशल और सरकार बनाने में महत्वपूर्ण भूमिका को याद किया, महाराष्ट्र के राजनीतिक परिदृश्य पर उनके प्रभाव को उजागर किया और उनकी अनुपस्थिति से छूटे शून्य को व्यक्त किया।

Web Title : Maharashtra Loses Ajit Pawar: Sanjay Raut Mourns, Recalls Key Moments

Web Summary : Sanjay Raut mourns Ajit Pawar's untimely demise, calling it a dark day for Maharashtra. He reminisces about Pawar's dedication, administrative skills, and key role in forming the government, highlighting his impact on Maharashtra's political landscape and expressing the void left by his absence.