“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:53 IST2025-09-29T15:53:13+5:302025-09-29T15:53:13+5:30
Imtiaz Jaleel News: सरकारकडून पूरग्रस्त लोकांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागातील मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन बंद करावे, अशी टीका करण्यात आली आहे.

“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
Imtiaz Jaleel News: पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत पाऊस सरासरीपेक्षा ६० टक्के जास्त झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून, दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाडा, सोलापूरसह अनेक ठिकाणी पाऊस आणि पूरस्थिती कायम आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपेल, असा खोचक टोला शिवसेना शिंदे गटाला लगावण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती आहे. सोलापुरातील पूरग्रस्त तिऱ्हे गावाला भेट दिली. एमआयएम पक्षाकडून पूरग्रस्त भागांना मदत केली जात आहे. सरकारकडून पूरग्रस्त लोकांची जी अपेक्षा आहे, ती पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागात मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन आहे ते बंद करावेत, अशी टीका एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केली.
गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल
सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात गुगल मॅपच्या माध्यमातून पूरस्थितीची पाहणी करावी, आणि गुगल मीटिंगमध्ये निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करता येईल ते बघावे. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात. ही सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, या शब्दांत निशाणा साधताना, गुवाहाटी येथून आणलेले पैसे जर दिले, तर महाराष्ट्रातील लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपवू शकता, असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.
दरम्यान, रविवारीही मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले. सोलापुरात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिकमध्ये गोदावरीचा पूर कायम आहे.