Agnipath Protest: अग्निपथवरुन महाराष्ट्रात हिंसाचार होणार? पोलीस विभाग सतर्क, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 18:24 IST2022-06-20T18:23:17+5:302022-06-20T18:24:09+5:30
Agnipath Scheme Protest: गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर राज्यातील सर्व रेल्वे पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबई आणि आसपासच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

Agnipath Protest: अग्निपथवरुन महाराष्ट्रात हिंसाचार होणार? पोलीस विभाग सतर्क, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
Agnipath Scheme Protest: केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन 'अग्निपथ' योजनेविरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे संतप्त होऊन देशातील तरुण बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये आंदोलन करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातही अग्निपथ योजनेविरोधात गाड्यांची तोडफोड आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे. त्यानंतर आता राज्यातील पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
पोलिसांच्या सुट्या रद्द
माहिती मिळताच सर्व रेल्वे पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, पुढील काही दिवस त्यांना सुट्या मिळणार नाहीत. या इंटेलिजन्स इनपुटनंतर रेल्वे यार्डची सुरक्षाही वाढवण्यात आली असून आरपीएफला कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांतील गाड्यांना लक्ष्य करू शकतात.
कोचिंग सेंटर्स आणि सोशल मीडियावर बारकाईने लक्ष
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील कोचिंग सेंटर्स आणि सोशल मीडियावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. या इनपुट अलर्टच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांना राखीव पोलिसांची एक कंपनी देण्यात आली होती. रेल्वे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण MMR विभागातील स्थानकांना देखील लक्ष्य केले जाऊ शकते. सध्या महाराष्ट्रातील या भागातील स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत
एकीकडे या योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत, तर दुसरीकडे अग्निपथ योजनेबाबत तिन्ही सेनांच्या वतीने 19 जून रोजी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये योजनेचे फायदे सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये 25 हजार अग्निवीरांची पहिली तुकडी लष्करात दाखल होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.