आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 06:30 IST2025-05-21T06:29:10+5:302025-05-21T06:30:13+5:30

भुजबळ यांना मंगळवारी राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानलेले आभार लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनात फडणवीस यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली असे स्पष्ट संकेत मिळाले.

After the agitation subsided, Bhujbal got a chance to become a minister; Dhananjay Munde's ropes were cut | आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

मुंबई : मराठा-ओबीसी आंदोलनाची धार कमी झालेली असताना आणि त्यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा आल्याने छगन भुजबळ यांच्या परतीचा मार्ग सुकर झाला आणि त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली.

भुजबळ यांना मंगळवारी राजभवनवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानलेले आभार लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनात फडणवीस यांचीही महत्त्वाची भूमिका राहिली असे स्पष्ट संकेत मिळाले. ओबीसींच्या प्रश्नांबद्दलची कळकळ हा फडणवीस आणि भुजबळ यांना जोडणारा दुवा. भुजबळांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय हा अजित पवार, खा. सुनील तटकरे, खा. प्रफुल्ल पटेल यांचा. भुजबळ मंत्री झाल्याने आता धनंजय मुंडे यांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत. अजित पवार गटाच्या कोट्यातील सर्व मंत्रिपदे भरली गेली आहेत. 

ओबीसी आधारासाठी निर्णय?
मुंडेंसारखा ओबीसी चेहरा मंत्रिमंडळातून गेला, ओबीसी नेते भुजबळांना आधीच घेतलेले नव्हते. अशावेळी टोकाची नाराजी व्यक्त करणाऱ्या भुजबळांना पुन्हा मंत्री करणे ही अजित पवार यांची मजबुरी होती का? ओबीसींची नाराजी परवडणारी नव्हती म्हणून भुजबळ यांना पुन्हा मंत्री केले का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आधारासाठी अजित पवार यांनी भुजबळ यांना परत आणले आणि ओबीसी मतदारांची गरज असलेल्या भाजप, शिंदेसेनेनेही त्याचे स्वागत केले असे आता म्हटले जात आहे.

‘ज्याचा शेवट चांगला, ते सगळं चांगलं...’
भुजबळ यांनी मध्यंतरी अजित पवारांवर टीका केली होती, ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहना’ असे म्हणत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. मंगळवारी भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पक्षाने आठ दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मी शपथ घेतली. मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार. शेवट चांगला ते सगळं चांगलं.

ओबीसींचा आवाज म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे बघितले जाते. भुजबळांसारखे ज्येष्ठ मंत्री, ओबीसी हितचिंतक मंत्रिमंडळात आल्याने त्याचा सरकारला फायदा होईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: After the agitation subsided, Bhujbal got a chance to become a minister; Dhananjay Munde's ropes were cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.