भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:33 IST2025-12-16T09:08:48+5:302025-12-16T10:33:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी सांगितले.

भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
पिंपरी चिंचवड - आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढत मैत्रीपूर्ण होईल असं घोषित केले परंतु पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावेन असं सांगत अजित पवारांनीभाजपाला आव्हान दिले. आता पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावे असा सूर स्थानिक पातळीवर सुरू झाला आहे.
याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आम्हाला स्थानिक पातळीवर शरद पवार गटाच्या लोकांसोबत चर्चा करून घ्या अशी सूचना केली होती. येणाऱ्या काळात आपल्या चिन्हावर कदाचित ते लढतील अशी साधक-बाधक चर्चा झाली. त्यानंतर माझ्या मुलीच्या लग्नावेळी सुप्रिया सुळेंचा मला कॉल होता. त्यावेळी निवडणुकीवर चर्चा झाली तेव्हा ताईंनीही आपल्या मतांची विभागणी होता कामा नये त्यामुळे स्थानिक पातळीवर तुम्ही बोलून घ्या असं म्हटलं होते. त्याप्रकारे आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करून वरिष्ठांना कळवू असं त्यांनी म्हटलं.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नंबरचा शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. भाजपाला थोपवायचे असेल तर स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे निर्देश आम्हाला दिले होते. अलीकडे आमच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात जर दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या तर मत विभाजन होईल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल असा सूर होता. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी भावना मत विभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढले पाहिजे अशी आहे. त्या अनुषंगाने आम्ही स्थानिक पातळीवर दोन्ही गटाच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. येत्या २-३ दिवसांत चित्र स्पष्ट होईल असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी माहिती दिली. सोबतच घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा अद्याप अधिकृत प्रस्ताव नाही. वरिष्ठ पातळीवरून जे आदेश येतील त्याचे पालन केले जाईल असंही सुनील गव्हाणे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या सोबतीला शिंदेसेनाही येणार?
दरम्यान, शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्रित आघाडी करून निवडणूक लढवतील अशी शक्यता असल्याचे नाना काटे यांनी वर्तवले. तर मत विभाजन टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चा होतील. आघाडीत लढताना फायदे तोटे होत असतात. त्यामुळे चर्चा करूनच पुढचा निर्णय होईल अशी सावध भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील गव्हाणे यांनी घेतली आहे.