२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:38 AM2024-02-07T11:38:56+5:302024-02-07T11:39:36+5:30

बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही असं फडणवीसांनी सांगितले.

After Ajit Pawar got NCP party and symbol, Devendra Fadnavis taunt to Sharad Pawar, Uddhav Thackeray | २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला

२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला

नागपूर - Devendra Fadnavis on NCP ( Marathi News ) निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित होता. आज जे लोकशाहीच्या नावाने ओरडतायेत त्यांनीच लोकशाहीचा मुडदा पाडला होता अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात देवेंद्र फडणवीसांनी या निकालावरून विरोधकांवर शरसंधान साधले. फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, यापूर्वी समाजवादी पक्षाचा वाद झाला होता. तेव्हा आणि इतर ५ प्रकरणात घेतलेली भूमिका तीच आहे. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो अपेक्षित आहे. बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पक्षाचे जे संविधान आहे त्याचे किती पालन केले गेले या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या गोष्टींचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आला आहे असं सांगत फडणवीसांनी अजित पवारांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

त्याचसोबत बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही. तर वेळोवेळी जे पक्षाचे संविधान होते त्याचे किती पालन केले गेले. निवडणुका झाल्या की नाही. आता नेमकी पार्टी कोणाची याचा विचार निकालात झाला आहे. २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला त्यांना लोकशाही काय असते हे समजलं असेल. आज जे लोकशाहीबद्दल ओरडतायेत त्यांनी खरे लोकशाहीचा मुडदा पाडला होता त्या लोकशाहीनेच त्यांना जागा दाखवली. २०१९ मध्ये जनतेचा कौला नाकारला गेला होता. मतदारांच्या निर्णयाला डावलून काम केले होते अशी टीकाही फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केली. 

"पवार साहेब जिथे उभे राहतील तिथे तो पक्ष उभा राहील" 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. हा सरासर अन्याय आहे, शरद पवारांवर अन्याय झाला आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात शंका नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. २८ राज्यात हा पक्ष असून त्यातील २३ राज्यांनी पाठिंबा दिला आहे. जे पदाधिकारी शरद पवारांच्या पाठिशी आहेत हे दाखवूनही दुर्दैवी निकाल दिला. आम्ही याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागू असं जयंत पाटलांनी म्हटलं. 
 

Web Title: After Ajit Pawar got NCP party and symbol, Devendra Fadnavis taunt to Sharad Pawar, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.