"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:18 IST2024-10-11T19:17:18+5:302024-10-11T19:18:13+5:30
Sayaji Shinde ncp : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
Sayaji Shinde joins Ajit Pawar led NCP | मुंबई : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करत राजकारणात एन्ट्री केली. आगामी विधानसभा निवडणुकीत ते आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक असतील असे पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पर्यावरणप्रेमी आणि समाजकार्याची आवड असलेला अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांची ओळख आहे. आगामी काळात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबद्दल पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता अजित पवारांनी भारी उत्तर दिले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, मी जास्त चित्रपट पाहत नाही पण सयाजी शिंदे यांचे काही चित्रपट पाहिले आहेत. प्रत्येकाला काही अभिनेते, अभिनेत्री आवडत असतात. सयाजी शिंदेंनी त्यांच्या कामाने एक वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील एखादा कलाकार किंवा एखादा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात पुढे गेल्यास अभिमान वाटतो. सयाजी शिंदेंचे चित्रपट समाजामध्ये जागृकता वाढवण्याचे काम करतात. त्यांनी उत्कृष्ट अशी पात्रे साकारली आहेत, त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षांपूर्वी झाली. झाडांची आवड असलेले अभिनेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते आमच्या पक्षात आले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांना कोणती जबाबदारी द्यायची याबद्दल सखोल चर्चा झाली आहे.
तसेच सयाजी शिंदे आगामी निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहतील. त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली असून, पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सयाजी शिंदे यांचा आदर आणि सन्मान राखला जाईल. यामध्ये सहकारी किंवा कार्यकर्त्यांकडून अडचण येणार नाही याची खात्री देतो. त्यांची राजकारणातील यात्रा सामाजिक कार्याप्रमाणे यशस्वी राहिल अशी मला खात्री आहे. आगामी काळात देखील लोक आमच्यासोबत जोडले जातील, असे अजित पवारांनी अधिक सांगितले.
दरम्यान, सयाजी शिंदे बोलायला लागले असता त्यांनी उभे राहून बोलू की बसून असा उपस्थितांना प्रश्न केला. यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही उभे राहणार आहात ना? असे विचारले. यावर शिंदे यांनी उत्तर देणे टाळले मात्र अजित पवारांनी सांगितले की, होय, प्रचारसभेच्या निमित्ताने उभे राहणार आहेत.