मेघडंबरीतील फोटो सेशनबद्दल रितेश देशमुखनं मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 12:00 IST2018-07-06T11:59:36+5:302018-07-06T12:00:58+5:30

सोशल मीडियावरील तीव्र टीकेनंतर रितेशचा माफीनामा

actor Riteish Deshmukh apologize for photo session at raigad meghdambari | मेघडंबरीतील फोटो सेशनबद्दल रितेश देशमुखनं मागितली माफी

मेघडंबरीतील फोटो सेशनबद्दल रितेश देशमुखनं मागितली माफी

रायगड: रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं चौफेर टीकेचा सामना करावा लागल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखनं माफी मागितली आहे. महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे केवळ भक्तीभाव होता. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र तरीही आमच्या कृत्यामुळे कोणी दुखावलं असल्यास आम्ही त्यांची माफी मागतो, असं रितेश देशमुखनं म्हटलं आहे. 

अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पानीपतकार विश्वास पाटील यांनी काल थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केलं. हे फोटो पाहून सामान्य शिवभक्त चांगलेच संतापले होते. सामान्य शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणास्तव सिंहासनाजवळ जाऊ दिलं जात नाही. मग रितेश देशमुख, रवी जाधव सिंहासनावर जाऊन फोटोशूट कसं करतात, असा प्रश्न शिवभक्तांकडून उपस्थित केला गेला. अनेकांनी सोशल मीडियावर रितेश देशमुख आणि रवी जाधव यांच्या या कृतीचा निषेध केला. त्यानंतर रितेश देशमुखनं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवभक्तांची माफी मागितली. 



'नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मीही इथल्या वातावरणानं भारावून गेलो होतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल, तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागतो,' अशी पोस्ट रितेश देशमुखनं फेसबुकवर लिहिली आहे. 

Web Title: actor Riteish Deshmukh apologize for photo session at raigad meghdambari