एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:50 IST2025-10-07T12:48:02+5:302025-10-07T12:50:50+5:30
एखाद्या सिनेमाचा प्रभाव तुमच्यावर पडलाय का या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायक सिनेमाचा उल्लेख केला.

एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने 'FICCI FRAMES 2025' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अक्षय कुमारच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलखुलास उत्तर दिली. सिनेमांचा वैयक्तिक आयुष्यावर पडणारा प्रभाव, पॉलिटिक्समधील रिअल हिरो कोण यासारख्या अनेक प्रश्नांवर फडणवीसांनी भाष्य केले.
या मुलाखतीत अक्षय कुमारने नायक सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनले तसं तुम्ही एक दिवसासाठी फिल्म डायरेक्टर बनला आणि त्या सिनेमाचं नाव महाराष्ट्र ठेवले तर त्याचा पहिला सीन काय चित्रित कराल असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर महाराष्ट्रावर सिनेमा बनत असेल, तर पहिला सीन असा असेल, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेकासाठी बसलेले असतील आणि इतक्या वर्षाच्या गुलामीनंतर स्वराज्याचं निर्माण हेच त्याचा पहिला सीन असेल असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या उत्तरावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला.
त्याशिवाय एखाद्या सिनेमाचा प्रभाव तुमच्यावर पडलाय का या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायक सिनेमाचा उल्लेख केला. आमच्या संवेदना, मानवी भावना असतात त्यावर सिनेमाचा प्रभाव पडतो. अनेक सिनेमांनी मला प्रभावित केले आहे. राजकारणाचं बोलायचं झालं तर एका सिनेमानं मला इतकं प्रभावित केले, त्याशिवाय या सिनेमानं माझ्या समस्या वाढवल्या, त्याचं नाव आहे नायक..त्या नायक सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभर इतके काम करतात ते पाहून मला अनेक लोक म्हणतात, तुम्ही नायकसारखे काम करा. एका दिवसात कसं त्यांनी जीवन बदललं, एवढे काम केले असं लोक मला सांगतात. मला एकेदिवशी अनिल कपूर भेटले, मी त्यांना विचारले तुम्ही नायक का बनवला? तुम्ही नायक आणि आम्ही नालायक असं लोकांना वाटू लागले. एका दिवसात तुम्ही इतक्या गोष्टी कशा केल्या, या सिनेमानं एक बेंचमार्क निर्माण करण्याचं काम केले. सिनेमाने नेहमीच आपल्या मानवी भावना जिवंत ठेवण्याचं काम केले असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
पॉलिटिक्समधील रिअल हिरो नरेंद्र मोदी
अभिनेता अक्षय कुमार याने पॉलिटिक्समधील रिअल हिरो कोण असं मुख्यमंत्र्यांना विचारले. तेव्हा आज भारताकडे पाहिले तर राजकीय इतिहासात आम्हाला रिअल हिरो म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात. भारतात गरिबी हटाओ नारा नेहमी दिला जायचा परंतु गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम मोदींनी करून दाखवले. आज भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. तंत्रज्ञान असेल, संरक्षण क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रात आज भारत जगाशी स्पर्धा करत आहे. आपण किती महान आहोत याची कहाणी ऐकत आलो परंतु आपण महान कधी बनणार हे कुणी सांगत नव्हते. आता आपल्याला मार्ग कळला आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचं स्वप्न आपण पाहतोय. हे चित्र नरेंद्र मोदींनी आमच्या डोळ्यासमोर आणले असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संत्री खाण्याची ही पद्धत नव्याने शिकलो - अक्षय कुमार
देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, मी आयुष्यात दुसऱ्यांदा मुलाखत घेत आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. तेव्हा मी त्यांना आंबा कसा खातात हा प्रश्न केला होता. बऱ्याच जणांनी माझी खिल्ली उडवली होती परंतु मी सुधारणार नाही. तुम्ही नागपूरातून येता, तिथे संत्री मिळतात. तुम्ही ती कशी खाता, साल काढून खाता की मिक्सरमध्ये टाकून ज्यूस पिता? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर संत्र्याला पिळून रस काढण्यापेक्षा तुम्ही त्याचे २ भाग करा, त्यावर थोडं मीठ टाका, त्यानंतर जसं आंबा खाता तसं खा..त्याची साल खाऊ नका. संत्री अशी खाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. जे नागपूरचे आहेत त्यांना हे माहिती आहे असं उत्तर फडणवीसांनी दिले. तेव्हा संत्री खाण्याची ही पद्धत नव्याने शिकलो, मी नक्की ते ट्राय करेन असं अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांना म्हटलं.