सहकार चळवळीचा कृतिशील मार्गदर्शक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:37 IST2026-01-29T12:36:27+5:302026-01-29T12:37:01+5:30
Ajit Pawar Death News: अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ही राज्यातील सर्वांसाठी विशेषतः राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद व वेदनादायक होती. त्यांच्या निधनाने समाजाने व विशेषतः सहकार क्षेत्राने एक संवेदनशील नेत्यास गमावले आहे.

सहकार चळवळीचा कृतिशील मार्गदर्शक
- विद्याधर अनास्कर
(सहकारी बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ)
अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ही राज्यातील सर्वांसाठी विशेषतः राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद व वेदनादायक होती. त्यांच्या निधनाने समाजाने व विशेषतः सहकार क्षेत्राने एक संवेदनशील नेत्यास गमावले आहे. अजितदादा यांचे सार्वजनिक व राजकीय जीवन हे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या सहकार चळवळीशी जोडलेले होते. विशेषतः सहकारी साखर कारखाने, सहकारी बँकींग, पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था आणि कृषी आधारीत सहकारी संस्था या क्षेत्रात त्यांची भूमिका आजपर्यंत प्रभावी राहीली आहे.
सन १९९१ मध्ये प्रथम ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बाबालाल काकडे यांच्या विरोधात निवडून आले. त्यानंतर प्रदीर्घ काळ त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. २०२३ पर्यंत ते जिल्हा बँकेचे संचालक होते. सन १९९८ ते २०११ या कालावधीत ते राज्य सहकारी बँकेचेही संचालक होते. दि. ११/१२/१९९८ ते दि. १७/१०/१९९९ या कालावधीत त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचीही धुराही सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा बँकेचा व्यवसाय, शाखाविस्तार, ग्रामीण पतपुरवठा यामध्ये मोठी वाढ झाली.
बारामती परिसर व पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांशी त्यांचा निकटसंबंध राहीला आहे. साखर महासंघ, वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट व शासनाच्या माध्यमातून अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना त्यांनी नेहमी मदतच केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर मिळावी यासाठी त्यांनी कारखान्याच्या उत्पादनवाढीसाठी कारखान्यांचे आधुनिकीकरण व आर्थिक स्थैर्य यावर नेहमीच भर दिला आहे.
नुकतेच त्यांनी आर्टीफिशल इंटलिजन्स म्हणजेच एआय च्या माध्यमातून ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनातर्फे ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. राज्य सहकारी बँकांच्या मदतीने यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदराने कर्ज योजना देखील जाहीर केली होती. साखर कारखानदारांनी आर्थिक शिस्त पाळावी याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे. साखर कारखानदारांनी व्यवसाय आणि राजकारण एकत्र न आणण्याच्या भूमिकेवर ते ठाम होते. दादांनी कृषी उत्पन्न बाजारसमित्या, सहकारी दूध संघ अशा विविध सहकारी संस्थांच्या बळकटीकरणास नेहमीच प्रोत्साहन दिले. सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजक शेतकरी व स्वयंरोजगार यांना संधी मिळावी यावर त्यांचा सतत भर राहीला आहे.
"सहकार ही केवळ आर्थिक रचना नसून सामाजिक चळवळ आहे" हा विचार त्यांच्या वक्तव्यातून वारंवार दिसून येत होता. राज्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकाराचा कणा मजबूत ठेवण्याची भूमिका त्यांनी सतत ठेवली व त्यादृष्टीने अनेक निर्णयसुद्धा घेतले.