"....असं सांगितल्याचं मान्य करणं, हेच बेकायदेशीर आहे"; दीनानाथ रुग्णालयाच्या 'त्या' मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाडांचं बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:32 IST2025-04-05T15:30:15+5:302025-04-05T15:32:41+5:30
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मांडलेल्या भूमिकेवरील काही मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवलं आहे.

"....असं सांगितल्याचं मान्य करणं, हेच बेकायदेशीर आहे"; दीनानाथ रुग्णालयाच्या 'त्या' मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाडांचं बोट
Deenanath Mangeshkar Hospital news Today: तनिषा भिसे या गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी नकार दिला. आधी १० लाख भरण्याची मागणी केली गेली. त्यामुळे रुग्णालयांवर गंभीर आरोप झाले. याच प्रकरणानंतर रुग्णालयाने सविस्तर खुलासा केला. महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाने मयत महिला आणि तिच्या कुटुंबालाच या सगळ्यासाठी जबाबदार धरल्याने लोक संतापले. याच मुद्द्यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयाकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेचे निवेदन पोस्ट करण्यात आले आहे. त्यातील काही मुद्द्यांवर जोर देत आव्हाडांनी रुग्णालयाची एसआयटी चौकशी न करता गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी काय मांडली भूमिका?
"दीनानाथने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकात जमेल तेवढे पैसे भरा म्हणजे मी दुसऱ्या डॉक्टरला बोलवतो असा उल्लेख असणं. पैसे जमा झाले नाही तर ससूनला घेऊन जा असं सांगितल्याचं मान्य करणं, हेच बेकायदेशीर आहे हे स्पष्ट आहे", असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
वाचा >>'मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?"; मुश्रीफ दीनानाथ रुग्णालयावर भडकले
"मूळात हॉस्पिटलने कोटेशन देताना ते जवळपास असणं अपेक्षित असताना ते 10 ते 20 लाख अंदाजे खर्च असणे हे सांगणं सुद्धा आश्चर्य कारक आहे. अंदाजे किंमतमध्ये एवढा डबल फरक असणं, हे सुद्धा नियमाला धरून नाहीये. गुन्हा दाखल करा, एसआयटी हवी कशाला?", अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.
*दीनानाथ ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकात जमेल तेवढे पैसे भरा म्हणजे मी दुसऱ्या डॉक्टर ला बोलवतो असा उल्लेख असणं*
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 5, 2025
*पैसे जमा झाले नाही तर ससून ला घेऊन जा असं सांगीतल्याच मान्य करण, हेच बेकायदेशीर आहे हे स्पष्ट आहे*
*मुळात हॉस्पिटल ने कोटेशन देताना ते जवळपास असणं अपेक्षित… https://t.co/5US7Ene1vbpic.twitter.com/66pUpWaDIC
याआधीही जितेंद्र आव्हाडांनी या रुग्णालयाच्या प्रशासनावर सडकून टीका केली आहे. "एवढं सगळं भरभरून दिल्यावरसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांचं काय घेऊन बसलात. हे लक्षण आहे उत्तम प्रशासकीय व्यवस्था नसल्याचे", अशी टीका आव्हाडांनी या रुग्णालयावर केली होती.
"मानवी जीवनात भावनांना आता काहीच किंमत उरली नसल्याचे, कल्याणकारी लोकशाही आता नावाला उरल्याचे; तरीही भविष्यात असे घडू नये म्हणून मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रशासन तसेच रुग्णालय विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी मी आशादायी असेन", अशी भूमिका आव्हाडांनी मांडली होती.