सरन्यायाधीशांच्या स्वागतावेळी अनुपस्थिती, प्राेटाेकाॅल भंग; कारवाईची बार कौन्सिलची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:38 IST2025-05-21T14:38:06+5:302025-05-21T14:38:43+5:30
१८ मे रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई विमानतळावर आले असता अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल न्या. भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती.

सरन्यायाधीशांच्या स्वागतावेळी अनुपस्थिती, प्राेटाेकाॅल भंग; कारवाईची बार कौन्सिलची मागणी
मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘सरन्यायाधीश’ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभावेळी राज्यशिष्टाचाराचा भंग करण्यात आला. मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्त सरन्यायाधीशांच्या स्वागतास अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाने मुख्य न्या. आलोक आराधे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
१८ मे रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई विमानतळावर आले असता अधिकाऱ्यांकडून प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल न्या. भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती.
समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून...
न्यायसंस्थेचा प्रमुख, त्यात पुन्हा त्याच राज्यातील व्यक्ती विमानतळावर उतरल्यानंतर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त कोणीही उपस्थित राहिले नाहीत.
त्यांची वागणूक योग्य आहे का? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला होता. त्याची दखल घेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाने मंगळवारी ठराव पारित केला.
राजशिष्टाचार न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल, असे पत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांनाही पत्र
विमानतळावर न्या. गवई यांच्या स्वागतासाठी आलेल्या बार कौन्सिलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्षांना प्रवेश न दिल्याने त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र बार कौन्सिलने मुख्य न्या. आलोक आराधे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.