Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:47 IST2025-08-12T19:45:18+5:302025-08-12T19:47:15+5:30
KDMC Meat Shop Ban News: भारताच्या स्वातंत्र्यदिनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीतील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले.

Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
भारताच्या स्वातंत्र्यदिनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीतील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, या निर्णयाने राजकारणात ठिणगी पडली असून विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनी काय खायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे त्यांनी शाकाहारी खायचे की मांसाहारी, हे कोणी ठरवू शकत नाही, असे ते म्हणाले. शिवाय, त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
#WATCH | Mumbai: On Kalyan-Dombivli Municipal Corporation reportedly ordered the closure of all slaughterhouses and meat shops on August 15, Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray says, "In our house, even on Navratri, our prasad has prawns, fish, because this is our tradition,… pic.twitter.com/ivxVhjHw2i
— ANI (@ANI) August 12, 2025
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना निलंबित केले पाहिजे. ते कोण आहेत, हे मला माहित नाही. स्वातंत्र्यदिनी आपण काय खायचे, हा आपला अधिकार आहे, आपले स्वातंत्र्य आहे. ते आपल्याला शाकाहारी खायचे की मांसाहारी हे सांगू शकत नाहीत. आपण निश्चितच मांसाहारी खाऊ." पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, "आमच्या घरात नवरात्रीतही मांसाहारी पदार्थ असतात. कारण ही आमची परंपरा आहे, हा आमचा हिंदू धर्म आहे. हा धर्माचा विषय नाही आणि हा राष्ट्रीय हिताचाही विषय नाही.", असेही ते म्हणाले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्टला सर्व मांस दुकाने आणि कत्तलखाने बंद करण्याच्या दिलेल्या निर्देशावर कल्याणमधील राजकीय नेते आणि स्थानिक मांस विक्रेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या आदेशात चिकन, मटण आणि मासे विकणाऱ्या दुकानांचा समावेश आहे. मात्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयामुळे परिसरातील मटण विक्रेत्यांसह नागिरकांमध्येही नाराजी पसरली आहे.