Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 06:40 IST2025-11-22T06:39:13+5:302025-11-22T06:40:24+5:30
Maharashtra local body elections: शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: विरोधी पक्षांचे उमेदवार पडून सत्ताधारी पक्षांचे उमेदवार जिंकतील, अशा प्रारूप याद्या बनविण्यात आल्या. हा घोळ पाहता ही निवडणूक ‘गेम सेट मॅच’ केली आहे, असा आरोप आ. आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. अशा निवडणुका घेण्याची गरज नसून ‘इलेक्शन’ऐवजी थेट ‘सिलेक्शन’च करा, अशी टीका केली.
निवडणुकांसाठी २ जुलै २०१५ ची मतदारयादी निवडणूक आयोगाने ग्राह्य धरली आहे. त्यामुळे या काळात १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. ७ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणाऱ्या प्रारूप यादीची तारीख पुढे ढकलून ती २० नोव्हेंबर केली. जाहीर केलेली यादी ‘मशीन रीडेबल’ नसल्याने गोंधळ झाला आहे, असे ते म्हणाले.
आठवड्यात यादीतील गोंधळ जनतेसमोर आणणार
सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांचे उमेदवार पडतील अशा प्रकारे प्रारूप याद्या बनविल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी एका बूथमधील अनेक मतदार दुसऱ्या बूथमध्ये हलवले आहेत. त्यामुळेच या याद्या येण्यासाठी वेळ लागला. वॉर्ड बनवणे, वॉर्डाच्या सीमारेषा आखणे जमले नाही. यादीच्या यादी उचलून दुसऱ्या यादीत टाकली आहे. या अत्यंत किचकट यादीत तुमची इमारत, तुमचे नाव यादीत आहे की नाही ते कळत नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास सुरू असून, येत्या आठवड्यात यादीतील गोंधळ जनतेसमोर आणू. काम न जमणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवणे गरजेचे आहे. हे जाणूनबुजून केले असल्यास जनतेचा मतदानाचा हक्क हिसकावला म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.