Aaditya Thackeray: "हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:36 IST2025-03-04T11:36:12+5:302025-03-04T11:36:37+5:30
Aaditya Thackeray on Dhananjay Munde Resign: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray: "हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे" अशी माहिती दिली.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आली आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की, फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हे सरकार बरखास्त झालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आपण पाहत आहे. कुठे लहान मुलींवर, महिलांवर बसमध्ये बलात्कार होत आहे. त्यावर गृहराज्यमंत्री म्हणतात हे शांततेत झालं म्हणून आम्ही काही करू शकत नाही."
"सर्वांनीच भयंकर वर्णन केलं"
"डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे. आम्ही हिच मागणी करत होतो की, पारदर्शक चौकशीसाठी आका म्हणून ज्यांचं नाव येत आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. आम्हीच नाही तर भाजपाचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते. भाषणं झाली, प्रत्येकाने भाषणं दिली. सर्वांनीच भयंकर वर्णन केलं आहे. हे सर्व झाल्यावर आम्हाला वाटलं होतं की मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील."
"सरपंचाला न्याय द्या"
"मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते?, मैत्रीच्या नात्यात बांधले होते? कोणत्या कारणामुळे बांधले होते हे आम्हाला माहित नाही. न्याय देऊ असं सांगितलं होतं. चौकशी लवकर पूर्ण होईल असं सांगितलं होतं. अधिवेशन सुरू झाल्य़ावर काल जे भयानक फोटो आले मला वाटत नाही की महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल. सगळेच हादरून गेले. डोळ्यात पाणी होते. कुटुंबाला काय वाटत असेल हे कळत नाही. माझं ही मन हलून गेलं आहे. सरपंचाला न्याय द्या. आपण चाललोय तरी कुठे?" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.