"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:44 IST2025-07-04T20:43:33+5:302025-07-04T20:44:16+5:30
"कुणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल आणि तोच मराठी मुलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ..."

"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
महाष्ट्रांतील शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले होते. सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. यानंतर, राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. यानंतर, ठाकरे बंधूंचा अर्थात मनसे आणि शिवसेनेचा (ठाकरे गट) पूर्व नियोजित ५ जुलैचा मोर्चा रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी विजयी मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मेळाव्यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं" -
उद्या वरळीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मिळावा घेत आहेत, असे विचारले असता फडणवीस म्हणाले. "त्यांनी नक्कीच विजयी मेळावा घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण, यामागची भूमिकाही त्यांनी लक्षात घ्यायला हवी. कमिटी तयार करणारे तेच, त्या कमिटीत आपल्या उपनेत्याला टाकणारे तेच, त्या कमीटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासून ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा, हे कॅबिनेटमध्ये घेणारे तेच, कॅबिनेटचा निर्णय करणारे तेच, निर्णयावर स्वाक्षरी करणारे तेच, मिरिटवर स्वाक्षरी करणारेही तेच आणि विजयी मेळावा घेणारेही तेच. मला असं वाटतं की, मराठी माणसाला हे लक्षात येतं, कोण दुटप्पी आहे? हे दुटप्पी धोरण आहे."
🕟 4.27pm | 4-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2025
LIVE | Media Interaction#MonsoonSession2025#Mumbai#Maharashtrahttps://t.co/6TnxEvB47X
जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल... -
फडणवीस पुढे म्हणाले, "आमचा विषय पक्का आहे. आम्ही समिती केली आहे. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तो निर्णय आणची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू. कुणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल आणि तोच मराठी मुलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ.