‘दादा… परत या!’च्या आक्रोशात अखेरचा निरोप, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 08:43 IST2026-01-30T08:43:12+5:302026-01-30T08:43:44+5:30
Ajit Pawar Death News: ‘दादा… आम्हाला सोडून जाऊ नका… परत या!’ या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामती आज अक्षरशः अश्रूंनी न्हाऊन निघाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘दादा… परत या!’च्या आक्रोशात अखेरचा निरोप, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
बारामती - ‘दादा… आम्हाला सोडून जाऊ नका… परत या!’ या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामती आज अक्षरशः अश्रूंनी न्हाऊन निघाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी आणि अंत्ययात्रेसाठी बारामतीत जनसागर उसळला होता.
पहाटेपासूनच बारामतीच्या रस्त्यांवर शांतता पसरली होती. दुकानांचे शटर खाली, रस्त्यांवर सन्नाटा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोकभाव होते. अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच नागरिक, कार्यकर्ते, महिला, वृद्ध, युवक मोठ्या संख्येने दाखल झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर ‘अजितदादा अमर रहे', ही एकच हाक होती. अंत्यसंस्कारावेळी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षातील नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. राजकीय मतभेद विसरून सर्वांनीच या क्षणी दुःख व्यक्त केले. फुलांचा वर्षाव करत आणि राष्ट्रध्वजाने आच्छादित पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.
‘दादा… दादा…’च्या हंबरड्याने काटेवाडी स्तब्ध
अंत्यसंस्कारांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव पवार कुटुंबीयांच्या काटेवाडी (ता. बारामती) येथील ‘पवार फार्म’ या निवासस्थानी आणण्यात आले होते. ‘दादा… दादा…’च्या हंबरड्याने संपूर्ण परिसर अक्षरशः थिजून गेला होता. जनसामान्यांच्या आक्रोशात, अश्रूंमध्ये आणि घोषणा देत काटेवाडीने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. अंत्यदर्शन व अंतिम निरोप देण्यासाठी पहाटेपासूनच काटेवाडीत जनसमुदायाची अलोट गर्दी उसळली होती. सुरुवातीला खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, मुले पार्थ पवार व जय पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार आदी दाखल झाले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी आणण्यात आले. काटेवाडी येथून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानपर्यंत पालखी मार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावरून शेकडो वाहनांच्या ताफ्यासह सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
बारामतीकरांनी पाळली शिस्त...
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जमला होता. यावेळी कोणतीही गडबड, गोंधळ न करता शिस्त पाळून त्यांच्या लाडक्या दादांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पहाटे पाच वाजल्यापासून चाहत्यांनी मैदानावर गर्दी केली होती.
जसजशी अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती, तसतसा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमा होत होता. प्रत्येकाला अजित पवारांना बघण्याची शेवटची इच्छा होती.
मैदान परिसरात व बाहेरच्या बाजूला अजित पवारांचे अंतिम दर्शन सगळ्यांना व्हावे, यासाठी डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महिलांची उपस्थितीदेखील मोठ्या संख्येने होती.
११ हजार पोलिसांचा बंदोबस्त
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सबंध राज्यभरातून मिळेल त्या वाहनाने लोकांनी बारामतीकडे धाव घेतली. या पार्श्वभूमीवर बारामती शहर व परिसरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांसह पुणे पिंपरी-चिंचवड, ठाणे, कोल्हापूर, सातारा येथील पोलिसांसह राज्य राखीव पोलीस (एसआरपी) असा ११ हजारांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कातर शब्दांनी अश्रूंची वाट केली मोकळी
“प्रत्येक दिवाळीला, प्रत्येक सणाला दादांना शुभेच्छा द्यायला यायचो... आज आमच्यावर काय वेळ आली,” अशा कातर शब्दांत काटेवाडीकरांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पत्नी खासदार सुनेत्रा पवार, मुले पार्थ पवार व जय पवार यांच्यासह कुटुंबीयांनी हात जोडत, शब्दांविना आपल्या भावना व्यक्त केल्या. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘एकच वादा... अजित दादा’, ‘अजितदादा अमर रहे’, ‘परत या... परत या दादा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विशेषतः महिलांच्या टाहोने वातावरण अधिकच भावनिक बनले.
गावासह बारामती शोकसागरात
राज्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या परिश्रमांच्या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला. प्रत्येक दौऱ्यात मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार आवर्जून काटेवाडीत येत असत. त्या वेळी ग्रामस्थांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन तत्काळ तोडगा काढणारा नेता आज अनंताच्या प्रवासाला निघून गेला, ही भावना काटेवाडीकरांना अस्वस्थ करत होती. या घटनेने काटेवाडी गाव जणू नि:शब्द झाले असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.
या मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभुराज देसाई, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मेघना बोर्डीकर यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री नारा लोकेश, सी. एम. रमेश, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गणेश नाईक, सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटील, रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, गिरीश महाजन, नीरज चंद्रशेखर, महादेव जानकर, जयकुमार गोरे, डॉ. अमोल कोल्हे, राधाकृष्ण विखे- पाटील, रितेश देशमुख, नरहरी झिरवळ, राहुल कुल, दत्तात्रय भरणे, राजेश टोपे, धैर्यशील मोहिते-पाटील, मकरंद पाटील, विजय शिवतारे, मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, राजेंद्र गवई, श्रीकांत शिंदे, डॉ. प्रीतम मुंडे, आकाश फुंडकर, निवेदिता माने, रुपाली चाकणकर, सचिन आहेर, सतीश चव्हाण, पोलिस महासंचालक सदानंद दाते, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.