महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 10:22 IST2025-07-26T10:22:27+5:302025-07-26T10:22:57+5:30
सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याने संजय शिरसाट यांनी नाराज होत मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले.

महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
मुंबई - राज्यात महायुती सरकार येऊन १० महिने उलटले मात्र मागील काही दिवसांपासून मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सतत वाद उभे राहताना दिसत आहे. त्यातच आता महायुतीमधील शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट(Sanjay Shirsat) आणि भाजपाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ(Madhuri Misal) यांच्यात मानापमान नाट्य रंगल्याचे दिसून येते. माधुरी मिसाळ यांनी विभागीय बैठक घेतली त्यामुळे नाराज मंत्री संजय शिरसाट यांनी थेट उघडपणे नाराजीचे पत्र मिसाळ यांना पाठवून यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घ्या असं त्यांना बजावले आहे. त्यामुळे बैठक घेण्याचा मलाही अधिकार आहे असं उत्तर माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना दिले आहे.
या नाराजीनाट्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मला २ दिवसापूर्वी हे पत्र मिळाले. हे पत्र वाचून मलाही आश्चर्य वाटले. माझ्याकडे जितकी खाती आहेत त्याच्या बैठका सुरू आहेत. मी प्रशासनासोबत खात्याची बैठक घेणे हा माझा अधिकार आहे. मंत्र्यांच्या अधिकारात मी कुठलीही ढवळाढवळ केली नाही. कुठल्याही बैठकीत मी निर्णय दिले नाहीत. त्यामुळे मी मंत्र्यांच्या अधिकाराचे कुठेही उल्लंघन केले असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विभागवार आढावा घेण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार खात्यांच्या बैठका सुरू आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्याकडून काही चूक होत असेल तर त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही मी पत्र पाठवले आहे. या प्रकाराबाबत मला जो काही निर्देश द्यायचा असेल मुख्यमंत्री देतील. त्याप्रमाणे मी त्यांच्या आदेशाचे पालन करेल. शिरसाट यांनी दिलेल्या पत्राला मी उत्तर दिले आहे. खात्याची बैठक घेणे हा माझाही अधिकार आहे. खात्याच्या कारभारात माझ्याही काही सूचना असू शकतात. त्याप्रमाणे मी बैठका घेते. मी शिरसाट यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले नाही. माझे कुणाशी वैयक्तिक बोलणे झाले नाही. शिरसाट यांचे पत्र मिळाल्यानंतर मी माझा खुलासा पाठवला असंही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलं.
संजय शिरसाट नाराज का?
सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याने संजय शिरसाट यांनी नाराज होत मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले. त्यात यापुढे विभागीय बैठक घ्यायची झाल्यास माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असं त्यांनी म्हटले. मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात. बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. माझ्याकडील विषयासंदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणे संयुक्तिक असेल असं शिरसाट यांनी म्हटलं तर आढावा बैठक घेण्यासाठी आपल्या परवानगीची आवश्यकता वाटत नाही, राज्यमंत्री म्हणून मला बैठक घेण्याचा अधिकार आहे असं माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिले.