विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

By संतोष कनमुसे | Updated: August 10, 2025 16:27 IST2025-08-10T16:22:01+5:302025-08-10T16:27:40+5:30

पंढरपूरात हिंदीत पूजा सांगण्यावरुन वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

A controversy has erupted after the Vitthal Temple in Pandharpur refused to offer puja in Marathi and instead offered puja in Hindi | विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

मागील काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरुन वाद सुरू होता. हिंदी सक्तीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारने मागे घेतला. तर दुसरीकडे, मुंबईत अनेक ठिकाणी हिंदी भाषेवरुन वाद झाल्याचे समोर आले. आता हिंदी भाषेचा वाद पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. पंढरपूरमधील तुलसी अर्चन पूजेवेळी एका अमराठी कुटुंबासाठी पूजा हिंदीमध्ये केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहुल सातपुते यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राहुल सातपुते यांचे कुटुंबीय पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे तुलसी अर्चन पूजेसाठी उपस्थित होते. यावेळी समितीच्या तुकाराम भुवनात साधारण ३०-३५ कुटुंबं पूजेसाठी जमली होती. समिती तर्फे एक गुरुजी स्टेजवर बसून सर्वांना सूचनांच्या माध्यमातून पूजा घडवत होते. सुरुवातीला सूचना मराठीत दिल्या. त्यानंतर एका कुटुंबाने मराठी कळत नाही म्हणून पूजा हिंदीमध्ये घ्यावी असे सांगितले. यावेळी गुरुजींनी एका कुटुंबासाठी पूजा हिंदीमध्ये घेतली. एका मराठी कुटुंबाने आक्षेप घेतला तरीही पूजा हिंदीमधून घेतली. या प्रकरणावरुन आता सोशल मीडियावर टीका सुरू आहेत. 

दरम्यान, आता या प्रकरणी सोशल मीडियावर कारवाई करण्याची मागणी सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या दैवताच्या दारातही मराठी सक्ती व्हायला सुरूवात झाली का?, अशा प्रतिक्रिया सुरू आहेत. तर दुसरीकडे, या पोस्टच्या कमेंटमध्ये राहुल सातपुते यांनी 
" मंदिर समितीकडून मला संदीप कुलकर्णी (पुजारी तथा सहायक्क, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर) इथून फोन आला. त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दोन दिवस मला द्या म्हणाले. हा विषय गंभीर आहे आणि मला त्यात लक्ष घालवे लागेल अस देखील सांगितल्याची माहिती दिली आहे. 

राहुल सातपुते यांची पोस्ट काय आहे?

पंढरपूरातील पूजे दरम्यानचा हा अनुभव राहुल सातपुते यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही पोस्ट शेअर केली आहे.

पंढरपूरमधील तुलसी अर्चन पूजेचा अनुभव-आता महाराष्ट्राच्या आद्य दैवताच्या दरबारात देखील हिंदी सक्ती?

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे तुलसी अर्चन पूजाचे आयोजन होते. माझ्या कुटुंबाने त्यात सहभाग घेतलेला. समितीच्या तुकाराम भुवनात साधारण ३०-३५ कुटुंबं पूजेसाठी जमली होती. समिती तर्फे एक गुरुजी स्टेजवर बसून सर्वांना सूचनांच्या माध्यमातून पूजा घडवत होते. सुरुवातीला सूचना मराठीत दिल्या.

तेवढ्यात ह्या ३०-३५ कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणालं की त्यांना मराठी कळत नाही, म्हणून पूजा हिंदीत घ्यावी. गुरुजी लगेच हसत हसत होकार देऊन संपूर्ण पूजा हिंदीत सुरू केली, अशी माहिती सातपुते यांनी पोस्टमध्ये दिली.

"मी हात वर केला आणि नम्रपणे सांगितलं – “आपण महाराष्ट्रात आहोत. आमच्या कुटुंबाला हिंदी कळत नाही. महाराष्ट्राची राजभाषा मराठी कळते. त्यामुळे कृपया मराठी भाषेत सूचना द्या.” पण यावर गुरुजी माझ्यावर चिडले आणि माईकवरूनच म्हणाले – “या माणसाचा काय विषय आहे? सिक्युरिटी आणि समितीवाले इकडे या आणि या माणसाशी बोला. त्याशिवाय पुढे पूजा सुरू करता येणार नाही.” अस म्हणून त्यांनी माईक बंद केला. उपस्थितांमध्ये चुळबुळ झाली. माझ्या समर्थनार्थ कदाचित ‘आपल्याला पूजेतून बाहेर काढतील’ या भीतीने एकही मराठी कुटुंब देखील पुढे आल नाही. 

सिक्युरिटी आणि समिती चे लोक आले आणि त्यांनी मला अश्वस्थ केले की पूजा  सर्वांसाठी मराठी आणि त्या एका कुटुंबासाठी हिंदी मध्ये होईल. ते अर्थातच समाधानकारक उत्तर नव्हत. पूजा मराठीतच व्हायला हवी होती. त्यांच ऐकून मी खाली बसलो. गुरुजींनी माईक हातात घेतला आणि आमच्या कडे बघून म्हणाले “तुमच्या एकट्या कुटुंबासाठी आम्ही मराठी मधून पूजा घेऊ शकत नाही.” हे अजिबात खरे नव्हते. एक हिंदी कुटुंब सोडून सर्व कुटुंबे मराठी होती. पण गुरुजींनी आमच एक मराठी कुटुंब अल्पसंख्याक आहे अस भासवलं आणि पूजा हिंदी तून सुरू केली. गुरुजींची “छुट्टी तुळशी उसमे डालिए” वगैरे तत्सम वाक्य कानांवर पडत होती. पूर्ण पूजा हिंदी मधून पार पडली. हिंदी समजत नसल्याने आम्हाला त्यांच्या सूचना समजत नव्हत्या. योग्य वागणूक न दिल्याने आणि आमच्या मराठी भाषेचा मान राखल्याने माझ मन तर केव्हाच त्या पूजेवरून उडाल होत. मराठीचा आग्रह धरल्याने आमच्या मराठी कुटुंबास महाराष्ट्राच्या पंढरपुरात जणू दोषी ठरवण्यात आल होत. ह्याला बाकी मराठी कुटुंबांनी बघ्याची भूमिका घेतली त्याच मला जास्त दुःख वाटल, अशी नाराजीही सातपुते यांनी व्यक्त केली. 

पूजा संपल्यावर मी गुरुजींना समक्ष भेटून हात जोडून म्हणालो –
“माऊली, तुम्ही माझ्या कुटुंबाला मराठीचा आग्रह धरला म्हणून सार्वजनिक रित्या माईकवरून दोषी ठरवलंत. अहो, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह नाही धरायचा, तर आम्ही मराठीचा आग्रह कुठे धरायचा? मला तुमची हिंदीत केलेली पूजा नीटशी कळलीसुद्धा नाही.”, असंही सातपुते पोस्टमध्ये म्हणाले.

गुरुजी म्हणाले – “अहो, पण एक कुटुंब होतं ना ज्यांना मराठी कळत नव्हतं. मी ही पूजा मराठीतच करतो, पण एखादं अमराठी कुटुंब असेल तर हिंदीत करतो. आम्ही सर्वसमावेशक आहोत. तुम्ही आता जा, तुम्हाला समितीवालेच समजावतील.”

मी म्हटलं – “ते मी करणारच आहे. मी समितीला पत्रव्यवहार करणार आहे. मी काही काशी विश्वेश्वराच्या मंदिरात मराठीचा आग्रह धरलेला नाही. किंबहुना आम्ही मराठी माणस तिकडे किंवा तिरुपती ला कधी मराठी बोला हा आग्रह धरत नाही. आम्ही तितके सुजाण आहोत. पण निदान महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या दरबारात मराठीचा आग्रह धरला, आणि तुम्हीच त्याला चूक ठरवलंत. आमच्या कुटुंबाला सार्वजनिक रित्या दोषी धरलत.”

आमच बोलण चालू असताना तिथे ताटकळत उभे असलेले गांधी टोपी/लुगड घातलेले मराठी भाविक महाप्रसादासाठी गर्दी करू लागले. त्यांच्याकडे बोट दाखवत मी गुरुजींना म्हटलं – “आमचा विठुराया हा ह्या गांधी टोपी-काष्टीपातळवाल्या गोरगरीब मराठी माणसांचा देव आहे. मराठी आमची माय आहे. गुरुजी, तुम्ही आज केलत ते चुकीच केल.” अस त्यांना हात जोडून सांगून मी तिथून निघालो.

मराठी मधून पूजा झाली नाही या पेक्षा माझ्या सोबतच्या जवळपास ३०-३५ मराठी कुटुंबांनी बघ्याची भूमिका घेतली याच मात्र जाम वाईट वाटलं. आपण ज्या लोकांसाठी भूमिका घेतोय त्या लोकाना त्या गोष्टीची काही पडलेली नाही हे मला जाणवल. 
वैयक्तिकरित्या मात्र मी यापुढे ह्या हिंदी भाषेतल्या पूजेत भाग न घेण्याचं ठरवलं आहे. इथून पुढ फक्त विठुरायाच दर्शन घ्यायचं याचा निश्चय करून तिथून निघालो, असंही सातपुते यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Web Title: A controversy has erupted after the Vitthal Temple in Pandharpur refused to offer puja in Marathi and instead offered puja in Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.