चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 06:05 IST2025-07-08T06:04:26+5:302025-07-08T06:05:01+5:30
छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागात मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा

चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
अजय पाटील
जळगाव : महाराष्ट्रात मान्सूनने समाधानकारक प्रगती केली आहे. ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यात कोकण, नाशिक, पुणे, अमरावती या चार विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर व नागपूर या दोन विभागांत अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यातील चिंता कायम
छत्रपती संभाजीनगर विभागात समाविष्ट असलेल्या आठही जिल्ह्यांमध्ये ७ जुलैपर्यंत सरासरीच्या १०० टक्क्यांपर्यंतही पाऊस झालेला नाही. या विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ९८ टक्के पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात सर्वात कमी ४४ टक्के, त्या खालोखाल लातूरमध्ये ५३ टक्के आणि परभणी जिल्ह्यात ५५ टक्के पाऊस झाला आहे. जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पावसाची स्थिती समाधानकारक नाही. ज्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
नागपूर विभागात गडचिरोली वगळता इतरत्र तूट
नागपूर विभागात केवळ गडचिरोली जिल्ह्यातच सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, इतर पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वात कमी ६६ टक्के पाऊस झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांत अशा कोसळल्या जलधारा
जून महिना : जूनमध्ये सरासरी २०७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यावर्षी ३० जूनपर्यंत राज्यात २०६ मिमी पाऊस झाला आहे.
जुलै महिन्याची सुरुवात : जुलैच्या पहिल्या सात दिवसांत (७ जुलैपर्यंत) सरासरी ७४.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो, तर प्रत्यक्षात ७४.४ मिमी पाऊस झाला आहे.
एकूण पाऊस : जून आणि ७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी २८२ मिमी पाऊस अपेक्षित असताना २८० मिमी पाऊस झाला आहे.