राज्यातील मोठ्या धरणांमध्ये ९0 टक्के पाणीसाठा, पिकांची स्थितीही उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 06:54 IST2020-08-30T06:52:29+5:302020-08-30T06:54:26+5:30
राज्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात खरीप पिकांची स्थितीही उत्तम आहे. कोरोनाकाळात पाऊस-पाण्याचे हे चित्र राज्यासाठी दिलासादायी आहे.

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये ९0 टक्के पाणीसाठा, पिकांची स्थितीही उत्तम
- योगेश बिडवई
मुंबई : वरुणराजाने यंदा महाराष्ट्रावर मोठी कृपा केली असून आॅगस्टमध्ये राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसाने राज्यातील ४१ मोठ्या धरणांत सरासरी ८९ टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे, असे जलसंपदा विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.
राज्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात खरीप पिकांची स्थितीही उत्तम आहे. कोरोनाकाळात पाऊस-पाण्याचे हे चित्र राज्यासाठी दिलासादायी आहे.
मराठवाडा : जायकवाडी ८७%
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ८७% साठा झाला आहे. पूर्णा येलदरी धरण भरले आहे. माजलगाव (७३%), उर्ध्व पैनगंगा (९१%) धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मांजरा धरणात मात्र ३ टक्केच पाणीसाठा झाला आहे.
विदर्भ : आठ धरणांमध्ये सरासरी ८५%
विदर्भातही पाऊसमान चांगले आहे. विभागातील महत्त्वाच्या आठ धरणांमध्ये सरासरी ८५ टक्के साठा झाला आहे. पेंच तोतलाडोह धरण १00% भरले आहे. उर्ध्व वर्धा (९८%), इडियाडोह (९७%) धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. गोसीखुर्द धरणात ४९ टक्के साठा झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्र : सात धरणे १00%
पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या सर्व १९ धरणांमध्ये जवळपास ९0 टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाला आहे. पानशेत, वरसगाव, खडसवासला, आंद्रा, नीरा देवघर, भाटघर आणि वीर ही धरणे १00 टक्के भरली आहेत. कोयना (९४%), वारणा (९५%) आणि भीमा-उजनी (९२%) ही धरणे लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत.
उत्तर महाराष्ट्र : भंडारदरा १00 टक्के
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मूळा धरण ९३ टक्के भरले आहे. भंडारदरा धरण १00 टक्के भरले आहे. दारणा (९३%), गंगापूर (९४%), गिरणा (७३%), हतनूर (४४%) धरणांमध्येही साठा वाढला आहे.
राज्यातील ११ धरणांतून पाण्याचा विसर्ग
राज्यातील ११ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील ८ धरणांचा समावेश आहे.
मुंबई : तीन तलाव १00%
मोडकसागर, विहार, तुळशी हे तलाव १00 टक्के भरले आहेत. तानसा (९९%), बारवी (९५%) आणि मध्य वैतरणा (९५%) हे तलावही लवकरच भरतील, अशी स्थिती आहे.
कोकण प्रदेश : पावसाचे धूमशान
कोकणात यंदा पावसाचे धूमशान सुरू असून कोकण प्रदेशातील भातसा (९८%), सूर्या धामणी (१00%), वैतरणा (९४%) या प्रमुख तीन धरणांत ९0 टक्क्यांवर पाणीसाठी झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.