सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार ताडोबा, पेंचमधून ८ वाघ; केंद्र सरकारची परवानगी
By संदीप आडनाईक | Updated: September 12, 2025 12:38 IST2025-09-12T11:38:36+5:302025-09-12T12:38:09+5:30
सह्याद्री प्रकल्पात वाघांची संख्या वाढणार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार ताडोबा, पेंचमधून ८ वाघ; केंद्र सरकारची परवानगी
संदीप आडनाईक
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला मान्यता देत ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून ८ वाघ (३ नर व ५ मादी) पकडून सह्याद्रीत स्थलांतर करण्याची परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बेन क्लेमेंट यांनी याला दुजोरा दिला आहे. या वाघांना पकडणे आणि त्यांच्या स्थलांतर प्रक्रियेदरम्यान वाघांना कमीतकमी त्रास होईल याची काळजी घ्यावी. योग्य पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत ही मोहीम राज्य वन विभागाच्या देखरेखीखाली पार पाडावी, असे या मंत्रालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा: मसाई पठारावर आता प्रवेशशुल्क; विनापरवाना प्रवेश, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई होणार
याशिवाय स्थलांतरानंतर सतत देखरेख ठेवून तिमाही अहवाल केंद्राला सादर करणे बंधनकारक असेल, कोणताही अनर्थ घडल्यास परवानगी मागे घेतली जाईल, असेही या आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, वन्यजीवप्रेमी व संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सह्याद्री प्रकल्पात वाघांची संख्या वाढणार
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ वेगवेगळ्या वाघांच्या हालचाली वर्षभरात नोंदविल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. या ठिकाणी वाघ आहेत हे निश्चित झाले आहे. आता नव्या पेंच आणि ताडोबा येथील ८ वाघांची यात भरच पडणार आहे.
सह्याद्रीत वाघांचे अस्तित्व
कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या डोंगररांगांमध्ये पसरलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील तुलनेने नवीन व्याघ्र प्रकल्प मानला जातो. येथे वाघांचे अस्तित्व आहे, परंतु संख्या स्थिर नाही. शिकार प्रजातींची उपलब्धता, दाट जंगल व योग्य अधिवास असतानाही वाघांची हालचाल मर्यादित राहिली आहे.
जैवविविधतेला चालना
ताडोबा व पेंच हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे वाघांचे अधिवास असून येथे तुलनेने संख्या जास्त आहे. येथून स्थलांतरित होणारे वाघ सह्याद्रीत नवीन जीवनक्षेत्र निर्माण करतील. यामुळे कोल्हापूर–रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेला चालना मिळेल.
सह्याद्रीत वाघ वाढले तर संपूर्ण सह्याद्री घाटमाळेला पर्यावरणीय व पर्यटनदृष्ट्या नवे महत्त्व प्राप्त होईल. -गिरीश पंजाबी, व्याघ्र अभ्यासक.