नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर कारागृहातून ८ जणांची सुटका; निकालानंतर मुक्त केले आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:51 IST2025-07-23T10:51:13+5:302025-07-23T10:51:42+5:30
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता करताच नाशिक, पुणे, अमरावतीसह नागपूर कारागृहातील १२ कैद्यांपैकी ८ जणांना पर्सनल बाँड घेऊन सोडण्यात आले.

नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर कारागृहातून ८ जणांची सुटका; निकालानंतर मुक्त केले आरोपी
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता करताच नाशिक, पुणे, अमरावतीसह नागपूर कारागृहातील १२ कैद्यांपैकी ८ जणांना पर्सनल बाँड घेऊन सोडण्यात आले. एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर उर्वरित दोन कैद्यांविरुद्ध अन्य खटले सुरू असल्याने त्यांची सुटका झालेली नाही. एक कैदी पॅरोलवर आहे.
साजिद म्हणताे, सगळा तपासच खोटा
आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो आम्ही निर्दोष आहे. आमचा छळ करत कबुली घेण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्या गोष्टी ट्रायल कोर्टासमोर होत्या, तरी देखील आम्हाला दोषी ठरवले. माझा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय होता, एवढंच बघून मला यात अडकवले गेले.
त्यांनी खोटे पुरावे आमच्या विरुद्ध उभे केले. खरे दोषी भेटले नाहीत म्हणून अडकवले. आज मी नसतो तर दुसरे कुणाला तरी पकडले असते. याप्रकारामुळे आमचे १३ जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे साजिद अन्सारीने सांगितले. मीरा रोडचा रहिवासी असलेल्या साजिदचे मायानगर येथे मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय होता.
जिहादी विचारसरणीकडे आकर्षित झाल्यानंतर तो अन्य अटक आरोपींच्या संपर्कात आला. बॉम्बस्फोट मालिकेसाठी त्याने टाइमर उपलब्ध करून दिले होते. विशेष म्हणजे तंत्रज्ञान अवगत असलेल्या साजिदचा वापर प्रत्येक टप्प्यावर करून घेण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर होता.
कमालला बनावट नोटांच्या तस्करीतही अटक
बिहारच्या मधुबनी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या कमाल अन्सारीने स्फोटांसाठी २ पाकिस्तानी अतिरेक्यांना नेपाळमधून मुंबईत आणून सोडले. माटुंगा रोड येथे झालेल्या स्फोटातील बॉम्ब कमाल याने पेरला. चोरट्या मार्गाने पाकिस्तानमध्ये जाऊन शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असा आरोप कमालवर होता. व्यवसायानिमित्त कमालची नेपाळमध्ये ये-जा असे. त्याला या आधी बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणीही अटक झाली होती. विशेष न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगताना २०२१ मध्ये कोरोनाने त्याचा मृत्यू झाला.
कोणत्या कारागृहातून किती आरोपी सुटले?
येरवडा कारागृह : २ पैकी १ मुक्त
अमरावती कारागृह : चारही कैदी मुक्त
नाशिक रोड कारागृह : २ पैकी १ मुक्त
नागपूर कारागृह : ४ पैकी २ मुक्त