एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:58 IST2025-05-05T06:58:23+5:302025-05-05T06:58:59+5:30
‘खड्डेमुक्त मुंबई’साठी पालिका मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करत आहे.

एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकने खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा ७९ कोटी रुपये खर्च करणार आहे. असे असतानाही पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी ७८ कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे खड्डे बुजवण्याचा खर्च यंदा कमी झाला असल्याचा दावा पालिका करत असली तरी प्रत्यक्षात हा खर्च म्हणावा तेवढा कमी झालेला नाही.
‘खड्डेमुक्त मुंबई’साठी पालिका मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करत आहे. ७०१ किमीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील रस्त्यांची ७५ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांची ५० टक्के कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मास्टिकने खड्डे बुजवण्याचा अंदाजित खर्च
पश्चिम द्रुतगतीच्या सर्व्हिस रोडसाठी १२,९३,११,६२५ रुपये
पश्चिम द्रुतगती मुख्य मार्गासाठी २७,५९,५१,०२८ रुपये
पूर्व द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडसाठी १२,५०,७४,४१६ रुपये
पूर्व द्रुतगती मार्गाच्या मुख्य मार्गासाठी २५,१८,६६,०१८ रुपये
कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. यंदाच्या पावसाळ्यात पालिकेला सुमारे २५० किमी लांबीच्या रस्त्यांवरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत.