उपाययोजनांवर ५७४ कोटी खर्च; मात्र मुंबईचा श्वास कोंडलेलाच ! मालेगाव, जालना आणि जळगावसह संपूर्ण राज्यातील हवा प्रदूषितच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 05:19 IST2025-11-11T05:19:22+5:302025-11-11T05:19:35+5:30
Air Pollution: मुंबईसह शहरांसोबत राज्यातील उर्वरित प्रमुख शहरांतील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठीचा निधी खर्च करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे.

उपाययोजनांवर ५७४ कोटी खर्च; मात्र मुंबईचा श्वास कोंडलेलाच ! मालेगाव, जालना आणि जळगावसह संपूर्ण राज्यातील हवा प्रदूषितच
मुंबई - मुंबईसह शहरांसोबत राज्यातील उर्वरित प्रमुख शहरांतील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठीचा निधी खर्च करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे. मुंबईने ९३८.५९ कोटी रुपयांच्या निधीमधून ५७४.६४ कोटी खर्च केले; परंतु प्रदूषण कमी करण्यात महापालिका अपयशी ठरल्याचेच समोर आले आहे.
वातावरण फाउंडेशन आणि एन्वारोकॅटलिस्ट यांनी संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्रातील सर्वच शहरांमधील वातावरणीय वायूची गुणवत्ता स्थिती या अहवालातून राज्यातील हवेच्या गुणवत्तेची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्राच्या सलग आठ वर्षांच्या आकडेवारीवर हा अहवाल आधारित आहे. केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमांतून पाच वर्षांपूर्वी राज्यभरातील शहरांचे प्रदूषण कमी व्हावे म्हणून निधी मंजूर केला होता.
नागपुरात सर्वात कमी निधीचा वापर
अमरावती आणि सोलापूरसारख्या शहरांनी वाटप केलेल्या निधीपैकी ९५ टक्क्यांहून अधिक निधीचा वापर केल्याचे समोर आले आहे. नागपूरने १४२.०५ कोटींच्या निधीमधून निम्म्याहून कमी रक्कम खर्च केली. मालेगावमध्ये सर्वाधिक पीएम २.५ ची पातळी नोंदवली गेली. त्यानंतर जालना आणि जळगाव या शहरांचा क्रमांक लागतो. २०२४-२५ मध्ये सांगलीमध्ये सर्वांत कमी, तर मालेगाव, परभणी, अहिल्यानगर आणि बेलापूर, नवी मुंबईत अधिक प्रदूषण आढळले.
हिवाळ्यापूर्वी आणि हिवाळ्यात, धोरणात्मक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर महाराष्ट्रावरील आरोग्य संकट वाढत जाऊन आर्थिक नुकसान होत राहील.
- भगवान केसभट,
वातावरण फाउंडेशन
आपण ज्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत आहोत, त्या तुलनेत स्त्रोतांवरील उत्सर्जन रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या आहेत.
- सुनील दहिया, एन्व्हायरोकॅटलिस्ट
पीएम २.५ (फाइन पार्टिक्यूलेट मॅटर) : हवेमध्ये आढळणारे सूक्ष्म प्रदूषक घटक, ज्यांचा व्यास २.५ मायक्रोमीटरपेक्षा अधिक नसतो. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते सहज फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये थेट जाऊ शकतात. परिणामी हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना इजा पोहोचू शकते.