निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 20:12 IST2019-07-30T20:11:21+5:302019-07-30T20:12:48+5:30
७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन एअरलाइन्सचे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते.

निमगिरी विमान अपघाताला झाली ५७ वर्षे, ९४ जणांचा गेला होता बळी
- नितीन ससाणे-
जुन्नर : सह्याद्रीच्या डोंगररांगांत दुर्गम जंगलात तुफानी पाऊस व वादळवाऱ्यात निमगिरी गावालगत दौंडया डोंगराला धडकून झालेल्या विमानअपघातात ९४ जणांचा बळी गेला होता. विमानअपघाताच्या या दुर्घटनेला जुलै महिन्यात ५७ वर्षे झाली. अजूनही पावसाळ्यात निमगिरीच्या आदिवासी भागात ज्येष्ठ वयोवृद्ध ग्रामस्थ विमान अपघाताच्या कटू स्मृती जागवतात. ७ जुलै १९६२च्या संध्याकाळी तुफान पावसात इटालियन एअरलाइन्सचे डग्लस डी सी -८:४३ हे विमान जुन्नरपासून ३० किलोमीटर अंतरावरील आदिवासी दुर्गम निमगिरी गावातील दौंड या डोंगराला धडकून कोसळले होते. या भीषण विमान अपघात विमानातील सर्वच्या सर्व ८५ प्रवाशांसह ९ कर्मचारी असे ९४ जण मृत्युमुखी पडले होते. फ्लाईट ए २७ ७१ ही आॅस्ट्रेलियातील सिडनी आणि इटलीतील रोमदरम्यान आंतरराष्ट्रीय शेड्युल्ड पॅसेंजर सेवा होती. डरबीन, सिंगापूर, बँकॉक, मुंबई, कराची यामार्गे हा विमान प्रवास होता. बँकॉकच्या डॉन माँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेले हे विमान मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळाकडे येत होते. या वेळी मुंबई विमानतळ जवळच्याच अंतरावर आले असताना ३,६०० फूट उंचीवर विमान असताना पावसाळी वातावरणात निमगिरी गावाजवळील डोंगराला धडकून दाट जंगलात चिखलात हे विमान कोसळले होते.
***
या विमानातील ऑक्सिजन सिलिंडरपैकी एक सिलिंडर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेची घंटा म्हणून वापरला जात होता. शाळेत सिलिंडर नको म्हणून शिक्षणाधिकाऱ्याच्या सूचनेवरून नंतर तो हलविण्यात आला. कॅलिफोर्निया ४.२. येथील झिपऱ्या मिसाईल ऑक्सिजन कंपनी बनविण्यात येणाऱ्या कंपनीचे हे सिलिंडर होते.