ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:50 IST2025-05-20T09:47:53+5:302025-05-20T09:50:04+5:30
Uddhav Thackeray Group News: आणखी काही माजी नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहे.

ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
Uddhav Thackeray Group News: एकीकडे मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असताना दुसरीकडे मात्र ठाकरे गटात सुरू असलेली गळती थांबताना दिसत नाही. एकामागून एक माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. यातच अवघ्या काही महिन्यांवर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर महापालिका राखण्याचे आव्हान असणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेली पंचवीस-तीस वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवलेल्या शिवसेनेत आता दोन गट पडल्यामुळे ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे ठाकरेंच्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढत चालल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची बैठक बोलवली नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. तर, उद्धवसेनेतून गेल्या दोन अडीच वर्षात सातत्याने नगरसेवक बाहेर पडत असून, ते शिंदे गटात सामील होत आहेत.
नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धवसेनेच्या मुंबईतील किमान ५० टक्के माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आणखी काही माजी नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. अशातच पक्षात असणारे माजी नगरसेवकही नाराज झाले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले. पण, ठाकरे यांनी बैठक न घेतल्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली आहे. वॉर्डचे आरक्षण कसे होणार? तिकीट मिळणार की नाही? अशा कारणांमुळे ते अस्वस्थ आहेत. पक्षप्रमुख नेते, उपनेते, विभागप्रमुखांची बैठक घेतात. मात्र, आमचे काय? त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतल्यास नाराजीची कारणे सांगू शकतो. पण, बैठक न घेतल्यामुळे नाराजी त्यांना कळणार कशी आणि कथी? अशी चर्चा उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये रंगली आहे.
दरम्यान, मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपेपर्यंत ठाकरे गटात सुमारे शंभर नगरसेवक होते. परंतु, किमान ५० टक्के माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान उभे ठाकल्याचे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणुकीची लय कायम राखत महायुती ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार की, मनसेला सोबत घेऊन उद्धवसेना महापालिका राखण्यात यशस्वी ठरणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.