माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:04 IST2025-07-29T12:00:32+5:302025-07-29T12:04:05+5:30
या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
मुंबई - विधानसभा सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आले आहे. कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे विरोधकांनी सरकारवर घणाघात केला. त्यात माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव वाढत चालला होता. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीआधी माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत कोकाटे यांनी घडलेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली परंतु अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बैठकीत माणिकराव कोकाटे यांनी भविष्यात अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र कोकाटे यांना भेटल्यावरच राजीनाम्याचा निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवारांनी दिली होती. माणिकराव कोकाटे यांनी याआधीही बरीच वादग्रस्त विधाने केली होती त्यामुळे कोकाटे यांच्याविषयी नाराजी आणखी वाढली आहे. अजित पवारांनी याआधी कोकाटे यांना समज दिली होती परंतु कोकाटे यांच्या वागणुकीत फारसा फरक पडला नाही. मात्र रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आणि कोकाटे यांच्या अडचणीत भर पडली.
या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. मात्र किती वेळा चुका माफ करायच्या, मंत्रिपद दिले तेव्हा तुम्ही कोण आले नाही आज राजीनामा नको म्हणून आलात असं सांगत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविषयी कारवाईचे संकेत दिले होते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षातही २ मतप्रवाह आहेत. त्यात कोकाटे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा राजीनामा घेऊ नका असं काहींचे म्हणणे आहे तर कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो असंही काही नेते म्हणत आहेत. त्यामुळे कोकाटे यांच्या बैठकीनंतर आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी रविवारी शनिमांडळ येथील प्रसिद्ध शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात विधिवत पूजा करून शनिदेवाला अभिषेक केला. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी त्यांनी शनिदेवाला साकडे घातले असे म्हटले जात आहे. गेल्या काही काळापासून मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयीची वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळात व्हिडीओ व्हायरलमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, विधिमंडळात पत्ते खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ, शासन भिकारी या अशा विधानांनी ते वादात अडकले.