गुंतवणूकदारांना ३० कोटींचा गंडा
By Admin | Updated: June 16, 2015 03:02 IST2015-06-16T03:02:09+5:302015-06-16T03:02:09+5:30
स्टॉक एक्सचेंज कंपनी स्थापन करून त्याचे सभासद करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

गुंतवणूकदारांना ३० कोटींचा गंडा
नवी मुंबई : स्टॉक एक्सचेंज कंपनी स्थापन करून त्याचे सभासद करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये कंपनीचे मालक व चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी रेल्वे स्टेशन ७ नंबर टॉवरच्या पाचव्या मजल्यावर इंटर कनेक्टेड स्टॉक एक्सचेंज प्रा. लि. नावाची कंपनी सुरू होती. कंपनीचे चालक व मालक यांनी स्टॉक एक्सचेंज कंपनी स्थापन करून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. सदर कंपनीचे सभासद होण्यासाठी ५ लाख रुपये फी घेतली होती. प्रत्येक वर्षी २५ हजार रुपये जमा करण्यात आले होते. १९९९ पासून आतापर्यंत जवळपास १५ वर्षे अनेकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूकदारांचे पैसे परत न मिळाल्यामुळे संबंधितांविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरीमधील रहिवासी बी. आर. पालवे व इतर गुंतवणूकदारांनी याविषयी तक्रार केली आहे. तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कंपनीचे मालक, चालक, कंपनीमधील शिरामण, आशिष नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून वाशी पोलीस पुढील तपास करत आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी वाशी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला, परंतु
तपास सुरू असल्यामुळे अधिक
माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. (प्रतिनिधी)