पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील ३ नेत्यांची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:13 IST2025-02-15T11:12:35+5:302025-02-15T11:13:24+5:30
एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे २ माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे ५ माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे

पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील ३ नेत्यांची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत. ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची रिघ लागली आहे. त्यात नुकतेच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला फटका बसला. यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कोकणतील ३ बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आल्याचं पत्रकातून कळवण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे रत्नागिरीत, ठाकरे गटाला बसणार धक्का
विधानसभेत मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास अनेक नेते उत्सुक आहेत. त्यात ठाकरे गटातील नेत्यांची मोठी संख्या आहेत. एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे २ माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे ५ माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. आजच्या कार्यक्रमात संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेना वाढावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. केवळ रत्नागिरीतच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचा चंग एकनाथ शिंदेंनी बांधला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उद्धवसेनेला राजापूर, लांजा तालुक्यात खिंडार पाडले होते. किरण सामंत आमदार झाल्यानंतर त्यांनी पक्षवाढीची मोहीम हाती घेतली आहे. त्यात गावातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत.