चिंताजनक! मराठवाड्यात महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:49 IST2019-11-19T03:27:43+5:302019-11-19T06:49:16+5:30
अवकाळीच्या फटक्यानंतर उचलले पाऊल

चिंताजनक! मराठवाड्यात महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या खरीप हंगामातील पिकांची माती झाली. या अवस्थेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात ६८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.
यंदाच्या दहा महिन्यांमध्ये मराठवाड्यात ७४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने ४१ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील कापणीला आलेले पीक हिरावून नेले. मका, सोयाबीन, कापूस व इतर कडधान्यांच्या पिकांचा अतिपावसामुळे चिखल झाला.
या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे गणितच बिघडले. कोरड्या दुष्काळानंतर गारपिटीचा फटका, तर अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी कर्जमुक्त होण्याऐवजी कर्जबाजारी होत चालला आहे. कर्ज फेडावे कसे, या चक्रव्यूहात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे हताश व निराश होऊन मराठवाड्यातील ६८ शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत आत्महत्या केल्या.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक
बीड जिल्ह्यात या महिनाभरात सर्वाधिक १६ जणांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद जिल्ह्यात ९, जालना जिल्ह्यात ६, परभणीत ११, हिंगोलीमध्ये ४, नांदेड १२, लातूर ७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट होते.