५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:20 IST2025-10-24T10:13:13+5:302025-10-24T10:20:34+5:30
Harshvardhan Sapkal on Defender: बुलढाणा शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची तब्बल दोन कोटी रुपयांची 'डिफेंडर' कार सध्या ...

५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
Harshvardhan Sapkal on Defender: बुलढाणा शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची तब्बल दोन कोटी रुपयांची 'डिफेंडर' कार सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. एका आमदाराकडे असलेल्या या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नव्हे, तर महायुतीच्याच एका नेत्याने उकरून काढला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. राज्यात एका ठेकेदाराकडून २१ आमदारांना डिफेंडर गाड्या भेट देण्यात आल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. गायकवाड यांनी ही महागडी डिफेंडर कार एका कंत्राटदाराकडून कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांवर आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. ही कार आपली नसून एका नातेवाईकाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्यावर राजकीय आकसापोटी आणि चुकीचे आरोप केले जात आहेत, असा पलटवारही त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांवर थेट आरोप केला आहे. सपकाळ यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या २१ आमदारांना एकाच ठेकेदाराकडून डिफेंडर गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.
"मागच्या काळात राज्यात ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी झाली होती. तसाच प्रकार आता होताना दिसत आहे. दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांना २१ डिफेंडर गाड्या एका ठेकेदाराने गिफ्ट केल्या आहेत. आता ते २१ आमदार आणि गिफ्ट देणारा ठेकेदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. याचे उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळेल. बुलढाण्यातील गाडी २१ वी आहे की २२ वी हे शोधायला हवं," असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
"आपण लोकशाहीमध्ये राहतो. आमदार खासदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. देशाची राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून तो पाठवलेला एक प्रतिनिधी आहे. त्याने प्रतिनिधी सारखं राहावं. विनाकारण विविध स्टिकर्स चिकटवून किंवा पोलिसांचा लवाजमा घेऊन फिरणं चुकीचे आहे. मी देखील आमदार होतो पण माझ्या कोणत्याच गाडीवर आमदाराचे स्टिकर्स नव्हते," असेही सपकाळ म्हणाले.