Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:15 IST2026-04-07T15:15:09+5:302026-04-07T15:15:47+5:30
Ashok Kharat And Anjali Damania : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाइलवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.

Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाइलवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी केला. याचा तपास करण्याची मागणीही त्यांनी केली.
समता पतसंस्था व्यवहारांची चौकशी करा
२७ ते ३१ जानेवारी या कालावधीत खरातच्या मोबाईलवर समता पतसंस्थेकडून मोठ्या प्रमाणात मेसेज आले होते. विशेष म्हणजे, २८ जानेवारी या दिवशी व्यवहाराचे तब्बल १९ मेसेज आले होते. त्याआधी २७ जानेवारीला १७, २९ जानेवारीला १०, तर ३० आणि ३१ जानेवारीला प्रत्येकी ८ मेसेज आले. हे नेमके कोणते व्यवहार झाले, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली.
अज्ञातकडून सीडीआर मिळाला - अंजली दमानिया
एका अज्ञात व्यक्तीकडून खरातचे सीडीआर मिळाल्यानंतर प्रथम त्याची सत्यता तपासली. मी कोणाकडूनही बेकायदेशीर माहिती मागितलेली नाही. माझ्याकडील माहिती मी पारदर्शकपणे तपास यंत्रणांना दिली आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईत सांगितले.
भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, संजय शिरसाठ तसेच मिलिंद नार्वेकर यांच्यासह विविध पक्षांतील काही नेत्यांचे कॉल रेकॉर्डस आढळल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा विषय राजकारणाचा नसून सत्य बाहेर आणण्याचा आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता वस्तुस्थिती समोर आणावी, असे आवाहन त्यांनी केले.
राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
खरातवर 'ईडी'कडून गुन्हा दाखल
महिलांचे शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. खरात याने अनेक ठिकाणचे भूखंड हडपण्यासह अवैधरीत्या अनेक मालमत्तादेखील खरेदी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
"कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
ईडीच्या अधिकाऱ्यांनी खरातची कोठडी मिळवून चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. खरातच्या मालमत्तांवर ईडीचे अधिकारी लवकरच छापेमारी देखील करणार असल्याची माहिती ईडीमधील सूत्रांनी दिली.