राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना १३३९ कोटींची मदत, जिल्हानिहाय निधी.. जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Updated: September 24, 2025 14:21 IST2025-09-24T14:20:58+5:302025-09-24T14:21:37+5:30
लवकरच संबधितांच्या खात्यावर पैसे वर्ग

राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना १३३९ कोटींची मदत, जिल्हानिहाय निधी.. जाणून घ्या
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या वीस जिल्ह्यांतील १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांना १३३९ कोटी ४९ लाख रुपयांच्या मदतीला शासनाने मान्यता दिली आहे. तातडीने हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
राज्यात यंदा मान्सूनपूर्व सह मान्सूनमधील पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषत: मराठावाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, यामध्ये खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी उघड्यावर पडला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यांना तत्काळ मदत देण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
राज्यात १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांचे तब्बल १५ लाख ४५ हजार २५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या क्षेत्राला शासकीय नियमानुसार १३३९ कोटी ४९ लाख रुपये मदत दिली असून, त्याला शासनाने मान्यता दिली आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच नांदेड, परभणी, सातारा व सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ६८९.५२ कोटी रुपयांच्या मदतीला सरकारने मान्यता दिली आहे.
हंगामात एकच वेळी मदत मिळणार
यंदा मे महिन्यात अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले होते. त्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तेही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे मदत दिली, याची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवली आहे.
जिल्हानिहाय अशी मिळणार मदत..
जिल्हा | शेतकरी | बाधित क्षेत्र (हेक्टर) | मदत निधी (कोटीत) |
अमरावती | १,६८,५३३ | १,२३,७६३ | १०८.७१ |
अकोला | ११,५९७ | ७,३१० | ६.२१ |
यवतमाळ | २,२६,६५२ | २,१०,८४५ | १८३.४२ |
बुलढाणा | १,८०,३६८ | १,४३,३८९ | १२१.८९ |
वाशिम | २,०१,८२४ | १,६९,२८४ | १४५.३५ |
गोंदिया | ३५६ | २५८ | ०.२३ |
भंडारा | ८,२८३ | २,५८९ | ४.३३ |
गडचिरोली | १८,३०७ | १०,९११ | १२.८९ |
वर्धा | ९,१०७ | ६,३८० | ५.४२ |
नागपूर | १,५७८ | १,०८३ | ०.९६ |
कोल्हापूर | ३६,५५९ | ८,८३५ | १४.२८ |
हिंगोली | ३,०४,८२९ | २,७१,५८६ | २३१.२७ |
बीड | १,१४,७७३ | ६६,७३१ | ५६.७३ |
लातूर | ३,८०,५११ | २,८७,१५१ | २४४.३५ |
धाराशिव | २,३४,९५५ | २,२२,९७५ | १८९.६० |
नाशिक | ७,१०८ | ४,०१४ | ३.८१ |
धुळे | ७२ | २३ | ०.०२ |
नंदुरबार | २५ | ११ | ०.०१ |
जळगाव | १७,३३२ | ८,०२७ | ९.८६ |
आहिल्यानगर | १४० | ७१ | ०.०६ |