अकरावी ऑनलाइन प्रवेश; आज अंतिम गुणवत्ता यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:00 IST2025-06-11T08:57:57+5:302025-06-11T09:00:05+5:30
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवार, ११ जूनला शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार आहे. तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांचा तक्रारीचा ओघ सुरू आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश; आज अंतिम गुणवत्ता यादी
मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवार, ११ जूनला शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार आहे. तर, दुसरीकडे विद्यार्थ्यांचा तक्रारीचा ओघ सुरू आहे. ७ ते ९ जूनदरम्यान मुंबईतील ३८१ विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवल्या. फ्रेशर विद्यार्थ्यांची रिपीटर, तर रिपीटर विद्यार्थ्यांची फ्रेशर म्हणून चुकीने नोंदणी झाल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरुवातीला संगणक प्रणाली कोलमडली होती. संगणक प्रणालीच्या तांत्रिक बाबींमुळे राज्यभरातील विद्यार्थी प्रचंड हैराण झाले. त्याबाबत १७ हजारपेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अजूनही तक्रारींचा सुरू असल्या तरी त्यांची संख्या मात्र आता कमी आहे. मुंबईत ९ जूनपर्यंत रात्री ३८१ एकूण विविध प्रकारच्या तक्रारी हरकती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या.
दुसऱ्या फेरीत नोंदणीची मुभा
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नावनोंदणीत चूक झाली होती. अर्ज भरण्यास राहून गेले. त्या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्षाकडे तक्रार नोंदवली. त्याबाबत त्यांनी आता प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी नाव नोंदणी करता येईल, अशी मुभा दिल्याचे वाळकेश्वर येथील विद्यार्थ्यांनी नीलिमा कराडकर हिने ‘लोकमत’ला सांगितले.