विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात होणार शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
By संदीप आडनाईक | Updated: January 4, 2026 16:57 IST2026-01-04T16:56:48+5:302026-01-04T16:57:57+5:30
100th Marathi Sahitya Sammelan: शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली.

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात होणार शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
- संदीप आडनाईक
सातारा - शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात जोशी यांनी ही माहिती दिली. राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये आणि मराठी सक्ती असावी याचा पुनरुच्चार करत जोशी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या शतक महोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबईत विशेष विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
माजी अध्यक्षांना महादजी शिंदे यांच्या नावे निधी
शतक महोत्सवी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या पुढच्या संमेलनात सर्व माजी अध्यक्षांना महादजी शिंदे यांच्या नावे एक लाख रुपयांचा सन्मान निधी देण्यात येत असल्याची घोषणा भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी या व्यासपीठावरून जाहीर केली. याशिवाय संमेलनासाठी ग. दि. माडगुळकर यांच्या नावे निधी जाहीर केला. यावेळी साहित्य परिषदेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सहा वर्षापूर्वी मागितलेल्या ५० लाखाच्या रक्कमेत भर टाकून एक कोटी रुपयांचा धनादेश उप मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.