‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 15:29 IST2023-11-10T15:28:40+5:302023-11-10T15:29:28+5:30
Madhya Pradesh News: काँग्रेस सरकार म्हणजे गरिबांचे सरकार आणि भाजप सरकार म्हणजे बड्या उद्योगपतींचे सरकार.

‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका
Madhya Pradesh News: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित करताना देशातील बेरोजगारीवरुन पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. 'ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, तिथे तरुणांना बेरोजगारीची गंभीर समस्या भेडसावते. भारत जोडो यात्रेदरम्यान मी ज्या भाजपशासित राज्यातून गेलो, तेथील तरुणांनी माझ्याकडे रोजगाराची सर्वाधिक चिंता व्यक्त केली,' अशी टीका राहुल यांनी केली.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रेदरम्यान मी तरुणांना विचारायचो, तुम्ही काय शिकलात आणि सध्या काय करता? कोणी म्हणायचं मी, इंजिनीअरिंग, कोणी मेडिकल, कोणी कायदेशीर शिक्षण घेतले आहे, पण ते सगळे बेरोजगार आहेत. या तरुणांना देशाच्या विकासात आणि उभारणीत हातभार लावायचा आहे, पण त्यांना रोजगार मिळत नाही.
देश के दलित, आदिवासी, OBC और सामान्य वर्ग के गरीब लोग GST देते हैं।
— Congress (@INCIndia) November 10, 2023
मोदी सरकार गरीबों से GST लेकर बैंक का पूरा पैसा 3-4 उद्योगपतियों को सौंप देती है।
: मध्य प्रदेश में @RahulGandhi जी pic.twitter.com/rwNMvuN4Ds
मध्य प्रदेशात उत्साही, सक्षम तरुण आहेत, पण त्यांच्याकडे रोजगार नाही. यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल. छत्तीसगड, हिमाचल आणि कर्नाटकमध्ये आमच्या पक्षाने यापूर्वी जी काही आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली आहेत. काँग्रेस सरकार म्हणजे गरिबांचे सरकार आणि भाजप सरकार म्हणजे बड्या उद्योगपतींचे सरकार. मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत, छोटे व्यावसायिक रोजगार देतात, पण पंतप्रधान मोदींनी देशातील छोट्या व्यावसायिकांची वाढ थांबवली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणतात की, देशात फक्त गरीब वर्गातील लोक जीएसटी भरतात आणि हे गरीब वर्ग ओबीसी, दलित आणि सामान्य वर्गातील दुर्बल लोक आहेत. केंद्रातील भाजप सरकार या गरीब लोकांकडून जीएसटी वसूल करते आणि ते पैसे बँकांच्या माध्यमातून देशातील तीन-चार उद्योगपतींना देते. आजच्या सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून छोट्या आणि मध्यम उद्योगांवर हल्ला केला. जीएसटी कर नाही, तर शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचे हत्यार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.