मुलांचं भांडण, पोलीस ऐकत होते तक्रार, तेवढ्यात माजी सैनिकाने भाजपा नेत्यावर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 16:26 IST2024-07-19T16:25:53+5:302024-07-19T16:26:35+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे मुलांच्या भांडणामधून एका माजी सैनिकाने भाजपा नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात भाजपा नेते प्रकाश यादव हे जखमी झाले आहेत.

मुलांचं भांडण, पोलीस ऐकत होते तक्रार, तेवढ्यात माजी सैनिकाने भाजपा नेत्यावर झाडल्या गोळ्या
मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे मुलांच्या भांडणामधून एका माजी सैनिकाने भाजपा नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात भाजपा नेते प्रकाश यादव हे जखमी झाले आहेत. माजी सैनिक आणि भाजपा नेत्याच्या मुलांमध्ये वाद होता. त्यातून हा गोळीबार झाल्याचं समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गोळीबार झाला तेव्हा तिथे पोलीसही उपस्थित होते. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश यादव यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रकाश यादव यांच्या समर्थकांनीही रुग्णालयाच्या बाहेर गोळा झाले आहेत. आता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, या गोळीबारातील मुख्य आरोपी असलेला माजी सैनिक फरार असून, त्याच्या मोठ्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
उज्जैनचे एसपी प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री सुमारे १२.३० वाजता नागझिरी ठाणे क्षेत्रामध्ये प्रकाश यादव आणि माजी सैनिकामध्ये वाद झाला. आरोपीकडे परवाना असलेली पिस्तूल होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. प्रकाश यांच्या घरासमोर पोलीस संपूर्ण घटनेची माहिती घेत होते. त्याचवेळी आरोपी सुरेंद्र प्रताप सिंग भदौरिया तिथे आला. त्याने आपली परवाना असलेली पिस्तूल काढली आणि गोळीबार केला. ह्या गोळ्या प्रकाश यादव यांच्या छातीमध्ये लागल्या.
एसपींनी सांगितलं की, सध्या भाजपा नेत्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आरोपी सुरेंद्र प्रताप सिंह भदौरिया याच्य मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. जुन्या वादामधून ही घटना घडली असून, मुख्य आरोपी सध्या फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे एसपींनी सांगितले.