IAS ची तयारी करणाऱ्या मुलाचा मृत्यू; पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, 7 जणांना जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 20:06 IST2024-08-01T20:06:18+5:302024-08-01T20:06:45+5:30
डॉक्टरांनी 24 वर्षीय मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर पालकांनी मोठा निर्णय घेतला.

IAS ची तयारी करणाऱ्या मुलाचा मृत्यू; पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, 7 जणांना जीवदान
MP News: मध्यप्रदेशच्या खरगोन, कासरवाड तालुक्यातील सांगवी गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ग्रॅज्युएशननंतर UPSC पास होऊन IAS होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या 24 वर्षीय विशाल मोयदे नावाच्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला. एकुलत्या एक पोराच्या मृत्यूने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगी मोयदे कुटुंबाने स्वतःला सावरले आणि असा निर्णय घेतला, ज्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएडचा पेपर सोडवत असताना विशालला अचानक डोकेदुखी झाली आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. समस्या गंभीर असल्यामुळे पुढे त्याला इंदूर आणि तेथून गुजरातमधील झायडस रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशालच्या मेंदूत शिरेचा गुच्छ तयार झाला होता. डॉक्टरांनी विशालला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही.
विशालच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. यानंतर आई सुशीलाबाई आणि वडील अंबाराम मोयदे यांनी आपल्या मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. विशालच्या पालकांच्या इच्छेनुसार वडोदरा येथे सुपर कॉरिडॉर तयार करण्यात आला. डॉक्टरांच्या पथकाने विशालच्या शरीरातून सात अवयव काढले. यकृत, हृदय, लहान आतडे, दोन्ही फुफ्फुसे आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. किडनी, झायडस हॉस्पिटल अहमदाबाद, फुफ्फुस, केडी हॉस्पिटल अहमदाबाद, हार्ट, रिलायन्स हॉस्पिटल मुंबई, लहान आतडे एमजीएम हॉस्पिटल चेन्नई आणि यकृत किरण हॉस्पिटल सुरत येथे पाठवण्यात आले.
आई-वडिलांनी केली अवयवांची पूजा
वडोदरा येथे त्यांच्या मुलाच्या अवयवदानाच्या वेळी विशालची आई सुशीला आणि वडील अंबाराम यांनी मुलाच्या अवयवांची पूजा केली. विशालचे वडील अंबाराम म्हणाले की, मला जगाला हा संदेश द्यायचा आहे की, प्रत्येक मानवाने असे काम केले पाहिजे. आपले मानवी अवयव एखाद्या गरजू व्यक्तीला उपयोगी पडत असतील, एखाद्याला नवीन जीवन मिळू शकत असेल, तर तो खूप मोठा आशीर्वाद आहे.