घरात वडिलांचा मृतदेह असताना सूरजने दिली दहावीची परीक्षा, मराठीचा पेपर दिल्यानंतर केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:55 IST2022-03-15T18:55:03+5:302022-03-15T18:55:53+5:30
Father Deadbody Found in Home : घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

घरात वडिलांचा मृतदेह असताना सूरजने दिली दहावीची परीक्षा, मराठीचा पेपर दिल्यानंतर केले अंत्यसंस्कार
चापोली (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शेतमजूर तातेराव किसनराव भालेराव यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले अन् त्यांचा मुलगा दहावीला. मंगळवारपासूनच दहावीचीपरीक्षा सुरू झाली. घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
चापोली येथील तातेराव किसनराव भालेराव (वय ४६) हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर नियमित उपचारही सुरू होते. मंगळवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा मुलगा सूरज यंदा दहावीला. त्यातच त्याची परीक्षाही आलेली. मंगळवारी त्याचा मराठीचा पेपर होता. त्याला नातेवाईकांनी परीक्षेला जाण्यासाठी तयार केले. त्याने परीक्षेहून आल्यानंतरच तातेराव भालेराव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे सूरजने परीक्षा दिली. सकाळी ११ ते २ या वेळेत त्याने मराठीचा पेपर सोडविला. त्यानंतर वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिला. वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी सूरजनेच दिला. घरात वडिलांचा मृतदेह असताना मनात आठवणी साठवूनच त्याने मराठीचा पेपर दिला. दुहेरी संकटात सापडलेल्या सूरजने आयुष्यातील ही कठीण परीक्षा दिली. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याच्या धैर्याचे कौतुकही केले. तातेराव भालेराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.