दुर्दैवी घटना... पाणी आणायला गेलेल्या दोन युवकांचा तळ्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 20:49 IST2021-10-19T20:48:55+5:302021-10-19T20:49:52+5:30
पोलिसांनी सांगितले की, एकोजी मुदगड येथे भैरवनाथ ज्योतीबा तोरंबे (२८) व रणजीत बळीराम इंगळे (३५) हे दोघे शेतात फवारणी करण्यासाठी जवळच असलेल्या संगाप्पा माशाळकर यांच्या शेततळ्यात पाणी आणण्यासाठी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गेले होते.

दुर्दैवी घटना... पाणी आणायला गेलेल्या दोन युवकांचा तळ्यात बुडून मृत्यू
कासारसिरसी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथे शेतात फवारणीसाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी सांगितले की, एकोजी मुदगड येथे भैरवनाथ ज्योतीबा तोरंबे (२८) व रणजीत बळीराम इंगळे (३५) हे दोघे शेतात फवारणी करण्यासाठी जवळच असलेल्या संगाप्पा माशाळकर यांच्या शेततळ्यात पाणी आणण्यासाठी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गेले होते. यावेळी भैरवनाथ तोरंबे हा पाणी घेत असताना पाय घसरून पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत होता. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी रणजीतही पाण्यात गेला. यावेळी दोघांचाही पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती मयताचे बंधू संजय बळीराम इंगळे यांनी कासार सिरसी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ ढमाले, विकास भोंग, वरवटे, भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचानामा केला. अधिक तपास पोहेकॉ. वरवटे हे करीत आहेत.