औसा (जि. लातूर) : तालुक्यातील याकतपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या दुचाकीच्या डिक्कीचे लाॅक ताेडून पाच लाखांची राेकड चाेरट्यांनी पळविल्याची घटना औशातील बसस्थानकासमाेर मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, याकतपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्यंकट सूर्यवंशी यांना घराचे बांधकाम करायचे आहे. यासाठी पाच लाखांची रक्कम शेतमाल विक्री करून आडत व्यापाऱ्याकडून दाेन लाख रुपये, तर सोन्याचे दागिने विक्री करत सराफाकडून तीन लाख रुपये असे एकूण पाच लाखांची जुळवाजुळव केली हाेती. दरम्यान, ती रक्कम दुचाकीच्या (एम.एच. २४ यू. १०२९) डिक्कीमध्ये ठेवली हाेती. औशातील बसस्थानकासमाेर दुचाकी थांबवत इलेक्ट्रिकल साहित्य घेण्यासाठी ते दुकानात गेले हाेते. इकडे अवघ्या पाच मिनिटामध्ये डिक्कीचे लॉक तोडून चाेरट्यांनी पाच लाखांची रोकड पळविली. ही घटना मंगळवारी दुपारी जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत औसा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच मिनिटात पाळत ठेवत फाेडली डिक्की...अवघ्या पाच मिनिटामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या दुचाकीवर पाळत ठेवत चाेरट्यांनी डिक्की फाेडली आहे. डिक्कीचे लॉक तोडून आत ठेवलेली पाच लाखांची पिशवी घेऊन चाेरटे पसार झाले आहेत. या घटनेनंतर काही वेळेत हा प्रकार फिर्यादीच्या पत्नीच्या लक्षात आला. त्यांनी डिक्कीचे लॉक तुटल्याचे फिर्यादी पतीला सांगितले. भेदरलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला एकच धक्का बसला. त्यांनी तातडीने घटनेची माहिती औसा पोलिसांना दिली.
पाेलिस पथकाची घटनास्थळाला भेट...पाच लाखांची राेकड पळविल्याची घटना समजताच पाेलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. औसा उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी, लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्यासह पाेलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांच्या मागावर विविध पाेलिस पथके आहेत. तपास सपोनि. शिंदे हे करीत आहेत.
चाेरी सीसीटीव्हीमध्ये कैद; पाळत ठेवत पळविली पिशवीमंगळवारी दुपारी आडत बाजारातून राेकड घेऊन दुचाकीच्या डिक्कीत ठेवल्याचे चोरट्यांनी पाहिले. तेथूनच दुचाकीचा पाठलाग केला. आडत बाजार ते बसस्थानकापर्यंत पाठीमागे दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या दोन्ही चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. दुचाकीवर असलेला समोरील चोरटा हेल्मेट घातला असून, दुसरा विना हेल्मेटचा आहे, असे चित्र कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहे.