भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:00 IST2022-05-30T15:00:21+5:302022-05-30T15:00:46+5:30
अपघातानंतर पसार झालेला ट्रक पोलिसांनी जवळपास १५ किमीचा पाठलाग करुन पकडला

भरधाव वेगातील ट्रकने चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
अहमदपूर (जि. लातूर) : भरधाव वेगातील एका ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील महात्मा बसवेश्वर चौकाजवळ रविवारी रात्री घडली आहे.
व्यंकटेश उर्फ बाळू बापूराव जगळपूरे (२६, रा. जगळपूर, ता. जळकोट) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, जगळपूर येथील व्यंकटेश जगळपूरे हा अहमदपूर येथील एका पेट्रोल पंपावर चार महिन्यांपासून कामाला होता. सध्या शहरातील गायकवाड काॅलनीत आईसोबत राहत असे. रविवारी रात्री तो दुचाकीवरुन शहरात येत होता. तेव्हा लातूरहून साखरेच्या गोण्या घेऊन निघालेल्या ट्रक (सीजी ०४, एनक्यू ८४८७) ने जोराची धडक दिली. त्यात तो चिरडल्याने जागीच ठार झाला.
हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक पसार झाला. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार व त्यांचे सहकाऱ्यांनी जवळपास १५ किमीचा पाठलाग करुन ट्रकला पकडले.