नदी जिवंत झाली अन् शेती हिरवीगार झाली, मंगला पांडगे यांचा नैसर्गिक शेतीचा आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:23 IST2025-09-28T12:21:36+5:302025-09-28T12:23:21+5:30
श्री श्री रविशंकर यांचा ‘नद्यांचे पुनरुज्जीवन’ प्रकल्प

नदी जिवंत झाली अन् शेती हिरवीगार झाली, मंगला पांडगे यांचा नैसर्गिक शेतीचा आदर्श
लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रगा हे गाव. जिथे कधीकाळी बोअरवेल आटल्या होत्या. टँकरच्या पाण्यासाठी रांगा लागत. तिथे मंगला पांडगे या नावाने आदर्श उभा केला. जिवंत झालेली नदी शेतकऱ्याच्या आयुष्यात काय बदल घडवू शकते, याचे त्या उदाहरण ठरल्या. मंगला यांच्या दहा एकर शेतीत शेवगा, संत्री, सीताफळ आणि बाजरीचे पीक होते. पावसाने दगा दिला तरी या पिकांतून त्या लाखोंचे उत्पन्न घेतात. जेथे फक्त एकदाच पीक घेता येत होते तेथे आज वर्षभर हिरवीगार शेती दिसते. मांजरा नदीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे हा बदल पहायला मिळत आहे.
पूर्वी फक्त पावसाळ्यातच शेती, आता दोन्ही हंगामांत
नदी पुनरुज्जीवनाच्या कामानंतर नदीलगतच्या गावांमधील टंचाईमुक्त स्थितीबाबत मंगला सांगतात, “आमचे गाव नदीपासून १० ते १५ किलोमीटर लांब, तरी आज येथे पुरेसे पाणी आहे. पूर्वी फक्त पावसाळ्यातच शेती करता येत होती. आता दोन हंगामात पीक घेतो. नदीत वर्षभर पाणी साठतंय, भूगर्भजल वाढलंय आणि लोकांनी डेअरी, तेल घाण्या, गिरण्या सुरू केल्या आहेत. जिथं पाणी आहे, तिथं भविष्य आहे.” मंगला यांना एका हंगामात फक्त शेवगा विकून साडेतीन लाखांहून अधिक नफा मिळाला. त्यांच्या शेतातील संत्री दर्जेदार असल्यामुळे आधीच बुकिंग होते.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ७२ हून अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन
मानवतावादी आणि आध्यात्मिक मार्गदर्शक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या दूरदृष्टीतून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून देशभरातील ७२हून अधिक नद्या व उपनद्यांचे पुनरुज्जीवन झाले आहे. ज्याचा लाभ २० हजारांहून अधिक खेड्यांत, साडेतीन कोटी लोकांना झाला आहे, असे म्हणतात, “जेव्हा नदीचे पुनरुज्जीवन होते, तेव्हा जीवनाचे पुनरुज्जीवन होते. पाणी शेतकऱ्याला प्रतिष्ठा देते, गावाला स्थैर्य देते आणि पुढच्या पिढीला आशा देते.”
मोहिमेचा गाभा : मोहिमेचा गाभा म्हणजे वॉटरशेड व्यवस्थापन. डोंगरकड्यापासून खोरीपर्यंत पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीत मुरावा यासाठी केलेले नियोजन. साध्या भाषेत, पाणी जिथे पडते तिथेच रोखून भूजल वाढविणे. आता गाळ काढलेल्या नदीत वर्षभर पाणी साठते, यामुळे विहिरी व बोअरवेल पुन्हा भरल्या.
१८ किमी मांजरा नदीपात्रातील गाळ व अडथळे हटविले
२०१६ च्या सलग दुष्काळानंतर लातूर कोलमडण्याच्या स्थितीत असताना गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगने जिल्हा प्रशासन, नागरिक आणि सीएसआर भागीदारांसह मांजरा नदीचे पुनरुज्जीवन सुरू केले.
१८ किमी नदीपात्रातील गाळ व अडथळे हटविण्यात आले, गावागावांतूननिधी उभारला गेला आणि स्वयंसेवक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले.
व्यापक चळवळीचा लाभ
महाराष्ट्रातील या व्यापक चळवळीअंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगने २०१३ पासून २७ जिल्ह्यांतील ३३ नद्या, नाले आणि उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले. ५७ हजारांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या, जवळपास २.९ कोटी घनमीटर गाळ काढला, ९४१ चौ.कि.मी. क्षेत्रावर याचा परिणाम झाला. ७.२ लाख झाडे लावली गेली. या प्रयत्नांचा लाभ २० लाखांपेक्षा अधिक लोकांना झाला.
‘नदी म्हणजे प्राणवाहिनी’
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पर्यावरण प्रकल्प संचालक महादेव गोमरे सांगतात, “नदी म्हणजे शरीराचे प्राणवाहिनी तंत्र, पाणी फक्त वाहून गेल्यास ते नष्ट होते. पण जेव्हा ते जमिनीत मुरते आणि पुन्हा नदीला मिळते, तेव्हा पूर्ण जलस्तर महिनोमहिने जिवंत राहतो.” आर्ट ऑफ लिव्हिंगने शेतकऱ्यांना उसापासून दूर जाऊन विविध पिके आणि शेतीसोबत झाडे लावण्याचा सल्ला दिला.