'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
By राजकुमार जोंधळे | Updated: May 21, 2025 07:44 IST2025-05-21T07:43:56+5:302025-05-21T07:44:54+5:30
मंगळवारी दुपारी २ ते ५ दरम्यान शेवटचा पेपर हाेता. मात्र, ३ वाजताच वसतिगृहात दाखल झालेल्या गायत्रीने ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपविले.

'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
लातूर : नांदेड जिल्ह्यातील मंग्याळ (ता. मुखेड) येथील मुळची असलेली गायत्री विष्णुकांत इंद्राळे (वय १७) हिने आत्महत्या करण्यापूर्वी मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावाकडे आईला काॅल केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. गायत्री आईला म्हणाली, आतापर्यंतचे सर्व पेपर चांगले गेले असून, मी उद्या बुधवारी दुपारपर्यंत गावाकडे येणार आहे. हा संवाद गायत्री आणि तिच्या आईचा शेवटचा ठरला.
मंगळवारी दुपारी २ ते ५ दरम्यान शेवटचा पेपर हाेता. मात्र, ३ वाजताच वसतिगृहात दाखल झालेल्या गायत्रीने ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. सकाळी आईशी माेकळेपणाने संवाद साधलेल्या गायत्रीने अचानकपणे दुपारी मध्येच पेपर साेडून वसतिगृहात का दाखल झाली?, तिने एवढ्या टाेकाचा निर्णय का घेतला? यामुळे तिचे कुटुंबीय चक्रावले आहेत. गायत्रीने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना सायंकाळच्या सुमारास मिळाली. त्यानंतर हे कुटुंब रात्री लातुरात दाखल झाले. गायत्री तशी शालेय जीवनापासून हुशार हाेती. याच गुणवत्तेवर तिला लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी शाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला हाेता.
प्राथमिक शिक्षण झाले मंग्याळ जि.प. शाळेमध्ये...
गायत्री इंद्राळे हिचे प्राथमिक शिक्षण सावरगाव (पीर) नजीकच्या मंग्याळ गावात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ७ वी पर्यंत झाले. ती अभ्यासात हुशार असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी तिला सावरगाव जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला.
दहावीत मिळाविले ९६ टक्क्यांवर गुण...
गायत्रीला इयत्ता दहावी बाेर्ड परीक्षेत ९६ टक्क्यांवर गुण मिळाले हाेते. याच गुणवत्तेवर तिला लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला हाेता. ती सध्याला प्रथम सत्रातील उन्हाळी द्वितीय सत्राची परिक्षा देत हाेती. पहिल्या सत्रातील काही पेपर राहिल्याचे महाविद्यालयाने सांगितले.
घरात काेरडवाहू शेतजमीन, कुटुंबाची स्थिती हालाखीची...
गायत्रीच्या घरची परिस्थिती हालाखीची हाेती. कुटुंबाचा गाडा वडील माेलमजुरी करुन हाकत हाेते. घरात अल्प काेरडवाहू माळरान शेती आहे. खरिप हंगाम घेतल्यानंतर मिळेल तिथे काम करुन त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी धडपड सुरु केली हाेती. विष्णुकांत इंद्राळे यांना तीन मुली, एक मलगा आहे. पहिल्या मुलीचा विवाह झाला. गायत्री तीन नंबरची मुलगी हाेती. घरात ती हुशार असल्याने तिला उच्च शिक्षण देण्याचे वडिलांचे स्वप्न हाेते.