साखरा पाटी येथे आठ महिन्यांत दहा अपघात; ९ जणांचा बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:46+5:302021-08-25T04:25:46+5:30
लातूर ते बार्शी हा महामार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर रात्रं-दिन माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुरुड ते ...

साखरा पाटी येथे आठ महिन्यांत दहा अपघात; ९ जणांचा बळी !
लातूर ते बार्शी हा महामार्ग दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावर रात्रं-दिन माेठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, मुरुड ते लातूरदरम्यानच्या मार्गावर साखरा पाटीचे वळण हे अधिक गंभीर आणि धाेकादायक असल्याचे समाेर आले आहे. गत अनेक दिवसांपासून याच वळावर माेठे भीषण अपघात घडल्याची नाेंद संबंधित पाेलीस ठाण्यात आहे. अपघात हाेताे, पाेलीस घटनास्थळी दाखल हाेतात आणि पंचानामा केला जाताे. मात्र, पुढे कारणांचा शाेध घेतला जात नाही. अनेकदा एकाच ठिकाणी अपघात का हाेतात, याबाबत काेणाही यंत्रणेला प्रश्न पडला नाही. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर हाेणाऱ्या अपघातात आता साखरा पाटीचे वळण हे अधिक धाेकादायक ठरले आहे. दर महिन्याला सरासरी दाेन अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातात किमान दाेन ते पाचजण मृत्यू झाल्याची नाेंद आहे. दाेन दिवसांपूर्वी बारा नंबर पाटी येथून पेट्राेल पंपाकडे निघालेल्या ट्रकचालकाचा वळण रस्त्यावर ताबा सुटला आणि विरुद्ध दिशेला हा ट्रक घुसला. मुरुडकडून लातूरच्या दिशेने येणाऱ्या स्कूटीला ट्रकने उडविले. ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दाेघेही ठार झाले.
रुंदीकरणाची गरज...
मुरुड ते लातूरदरम्यान साखरा पाटी येथील वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज आहे. शिवाय, साइडपटट्या भराव्या लागणार आहेत. वर्षभरात जवळपास २५ ते ३० अपघात झाल्यानंतरही संबंधित यंत्रणा जाग्यावरून हलायला तयार नाही. परिणामी, हाेणाऱ्या अपघातात वाहनधारकांचा नाहक बळी जात आहे. साखरा पाटी ब्लॅक स्पाॅट ठरला आहे. अतिशय धाेकादायक वळण असल्याने अपघात वाढले आहेत.