साखर कारखाना हा सोन्याचे अंडे देणारा उद्योग; एका दिवसात संपवू नका: नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:00 IST2025-11-11T14:58:18+5:302025-11-11T15:00:02+5:30
ऊस उत्पादकांनी कमीत-कमी पाणी, खत आणि उत्पादन खर्चातून अधिक उत्पादन मिळविले पाहिजे.

साखर कारखाना हा सोन्याचे अंडे देणारा उद्योग; एका दिवसात संपवू नका: नितीन गडकरी
किल्लारी (जि. लातूर) : साखर कारखाना हा सोन्याचे अंडे देणारा उद्योग आहे. तो एका दिवसात संपवू नका, तर दररोज अंडी देणारी कोंबडी समजून सहकार्य करा. साखर उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू नये; इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन निर्मितीकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. ऊर्जा दाता बनल्याशिवाय साखर उद्योगाचे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले.
औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषिरत्न बी.बी. ठोंबरे होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बी.बी. ठोंबरे म्हणाले, किल्लारी कारखान्याची यंत्रसामग्री जुनी व मोडकळीस आलेली असल्याने हा कारखाना सुरू करणे म्हणजे जणू शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे, असा सल्ला मी आ. अभिमन्यू पवार यांना दिला होता. मात्र त्यांनी हा संभ्रम दूर करत कारखान्याला नवजीवन दिले आहे.
कमी खर्चातून अधिक उत्पादन मिळविले पाहिजे
गडकरी म्हणाले, शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे अत्यावश्यक आहे. ऊस उत्पादकांनी कमीत-कमी पाणी, खत आणि उत्पादन खर्चातून अधिक उत्पादन मिळविले पाहिजे.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, गडकरींनी देशभर चांगले रस्ते बांधले, तर अभिमन्यू पवारांनी मतदारसंघातील शेतरस्त्यांद्वारे विकासाचा मार्ग तयार केला आहे. कारखाना सुरू करण्यासाठी एनसीडीसीमार्फत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ७३ कोटी रुपये, तर राज्य सरकारने १८ कोटी रुपयांची मदत दिली, असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.