औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सीईटीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:28+5:302021-08-28T04:24:28+5:30
चापोली : बारावीचा निकाल ३ ऑगस्टला जाहीर झाला असून औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झाले ...

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सीईटीची प्रतीक्षा
चापोली : बारावीचा निकाल ३ ऑगस्टला जाहीर झाला असून औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झाले नाही. परिणामी, प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी घेण्यात येते. १२ वीनंतर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा होते. पण, अद्याप या परीक्षेविषयी कोणताच निर्णय झालेला नाही. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार विद्यार्थी तयारी करीत आहे. परंतु, जोपर्यंत सीईटीचा निकाल जाहीर होत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यासह पालकांचे लक्ष सीईटीच्या तारखेकडे लागले आहे.
गेल्या वर्षी एमबीए सीईटी वगळता इतर सीईटी परीक्षा उशिराने झाल्या. त्यामुळे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. यंदा १२ वीच्या निकालास उशीर झाला. अशा परिस्थितीत सीईटी सेलकडून आगामी परीक्षांच्या नियोजनाबाबत माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढत आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून सीईटी उशिरा होत आहे. बी. फार्मसीला प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. १२ वीनंतर बीए, बीएससी, बीकॉम आणि अन्य विद्या शाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीईटी उशिरा होत असल्याने बी फार्मसीचे प्रवेशही उशिरा होणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसीला प्रवेश मिळाला नाही व इतर विद्या शाखांचे प्रवेश बंद झाले, तर विद्यार्थ्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा असा प्रश्न निर्माण होत आहे.
आठवडाभरात वेळापत्रक जाहीर होईल...
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी १६ ऑगस्ट ही रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख होती. त्यामुळे सीईटीची तारीख निश्चित होणे अपेक्षित होते. इतर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. पुढील आठवड्यात सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे, असे महाळंग्रा येथील दिनशे बेंबडे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत ढगे म्हणाले.
मानसिक ताण वाढला...
नीटच्या परीक्षेची तारीख निश्चित झाली आहे. मात्र अद्याप सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. कोविडमुळे ऑफलाइन अभ्यासक्रम झाला नाही. त्यात ऑनलाइन अभ्यासक्रम आणि परीक्षा लांबणीवर जात असल्याने अभ्यासाबरोबरच मानसिक ताणही वाढत आहे, असे येथील विद्यार्थी सुशांत पांचाळ याने सांगितले.